तरसोद–पाळधी बायपास महामार्गाची दयनीय अवस्था ; असोदा उड्डाण पुलाजवळ अपघातांचा धोका वाढला
नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज. डॉ.दीपक लोखंडे | जळगाव तालुक्यातील तरसोद ते पाळधी दरम्यानचा बायपास महामार्ग सध्या अत्यंत खराब स्थितीत असून वाहनधारकांसाठी तो जीवघेणा ठरत आहे. विशेषतः असोदा उड्डाणपुलावरून उतरताच मोठमोठे खड्डे सुरू होत असल्याने वेगात असलेल्या वाहनचालकांचा अंदाज चुकत आहे. परिणामी या भागात अपघातांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. तसेच तरसोद उड्डाणपूल जवळून नशिराबाद कडे जाणाऱ्या सर्विस रोड वर सुद्धा अशीच खड्ड्यांची चाळण बघावयास मिळते.
पूल संपताच खड्ड्यांचा धोका
असोदा उड्डाणपुलावरून खाली उतरताना वाहनांचा वेग जास्त असतो. मात्र पूल संपताच एक फूट खोल खड्डे समोर येत असल्याने चालकांना अचानक ब्रेक लावावे लागतात. यामुळे मागील वाहनांच्या धडका बसण्याची किंवा खडीवर वाहन घसरून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. गेल्या काही दिवसांत अनेक दुचाकीस्वार येथे घसरून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
साईडपट्ट्यांचीही दुरवस्था
महामार्गावरील समस्या केवळ मुख्य रस्त्यापुरती मर्यादित नसून, दोन्ही बाजूंना असलेल्या साईडपट्ट्याही खड्ड्यांमुळे पूर्णपणे खराब झाल्या आहेत. समोरून येणाऱ्या वाहनांना वाट देताना चालकाने गाडी बाजूला घेतल्यास वाहन खड्ड्यात अडकून पलटी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच अवजड वाहनांच्या चाकांमध्ये बिघाड होण्याच्या घटनांमागेही साईडपट्ट्यांची हीच अवस्था कारणीभूत ठरत आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) प्रशासनावर नागरिकांचा रोष
रस्त्यावरील डांबर उखडून निघाले असून अनेक ठिकाणी खडी पसरलेली आहे. टोलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महसूल गोळा करणाऱ्या भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (NHAI) या समस्येकडे दुर्लक्ष का केले, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. मोठ्या अपघाताची प्रतीक्षा न करता प्रशासनाने तातडीने या मार्गाची, विशेषतः उड्डाणपुलाजवळील भागाची दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
ठळक मुद्दे :
- असोदा उड्डाणपूल उतरताच खोल खड्ड्यांचा सामना
- अचानक ब्रेकमुळे वाहन घसरण्याच्या घटनांत वाढ
- एक फूट खोल खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान
- साईडपट्ट्या नसल्याने वाहन बाजूला घेणे धोकादायक ठरत आहे.
