बुटकेपणालाही मिळणार दिव्यांगत्वाचा दर्जा! केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; उंचीनुसार दिव्यांगत्वाची टक्केवारी ठरणार
१४७ सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा कमी उंचीच्या व्यक्तींचा समावेश : सरकारी नोकरी, शिक्षण आणि आरक्षणाच्या लाभांसाठी महत्त्वाचे नवे निकष
मुंबई.मंडे टु मंडे न्युज || दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांसंदर्भात केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बुटकेपणा (Dwarfism) या शारीरिक स्थितीच्या मूल्यांकनासाठी केंद्र सरकारने सुधारित मार्गदर्शक तत्त्वे अधिसूचित केली आहेत. या नव्या नियमांमुळे बुटकेपणा असलेल्या व्यक्तींच्या दिव्यांगत्वाचे प्रमाण निश्चित करण्याची प्रक्रिया अधिक स्पष्ट होणार असून, त्यांना दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्याच्या प्रक्रियेत सुसूत्रता येणार आहे.
केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयांतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाने (DEPwD) १८ नोव्हेंबर २०२६ रोजी दिव्यांगत्वाच्या मूल्यांकनासाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ अंतर्गत ही मार्गदर्शक तत्त्वे अधिसूचित करण्यात आली आहेत.

१४७ सेंटीमीटर उंचीचा निकष निश्चित
नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रौढ व्यक्तीची उंची १४७ सेंटीमीटर (सुमारे ४ फूट १० इंच) किंवा त्यापेक्षा कमी असल्यास बुटकेपणाच्या निकषांत तिचा समावेश केला जाणार आहे. यामुळे बुटकेपणा असलेल्या व्यक्तींच्या शारीरिक स्थितीचे वैद्यकीय मूल्यांकन करण्यासाठी निश्चित निकष उपलब्ध होणार आहेत.
प्रत्येक एक इंच कमी उंचीसाठी ४ टक्के दिव्यांगत्व
या निर्णयातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे दिव्यांगत्वाची टक्केवारी निश्चित करण्याची पद्धत. निर्धारित १४७ सेंटीमीटर उंचीच्या तुलनेत प्रत्येक एक इंच कमी उंचीसाठी ४ टक्के स्थायी शारीरिक दिव्यांगत्व मोजण्याची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय हाडांशी संबंधित विकृती किंवा अन्य शारीरिक समस्या असल्यास त्यांचे स्वतंत्र वैद्यकीय मूल्यांकन केले जाणार आहे.

४० टक्के दिव्यांगत्वासाठी काय असणार निकष?
सरकारी नोकरी, शिक्षण आणि विविध शासकीय योजनांमधील दिव्यांग आरक्षणाचे लाभ मिळवण्यासाठी साधारणतः किमान ४० टक्के दिव्यांगत्व असणे आवश्यक असते. नव्या उंचीच्या निकषानुसार, केवळ उंचीच्या आधारावर ४० टक्के दिव्यांगत्व पूर्ण होण्यासाठी निर्धारित उंचीपेक्षा सुमारे १० इंच कमी उंची असणे आवश्यक ठरेल. म्हणजेच संबंधित व्यक्तीची उंची साधारण १२१.६ सेंटीमीटर (४ फूट) असणे अपेक्षित आहे.
मात्र, इतर शारीरिक विकृती किंवा वैद्यकीय कारणांमुळे दिव्यांगत्वाची एकूण टक्केवारी वेगळी ठरू शकते. अंतिम प्रमाणपत्र सक्षम वैद्यकीय प्राधिकरणाच्या मूल्यांकनानुसार दिले जाईल.

दिव्यांगत्वाच्या मूल्यांकनासाठी आठ श्रेणी
सुधारित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये दिव्यांगत्वाच्या मूल्यांकनासाठी आठ प्रमुख श्रेणींचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पुढील प्रकारांचा समावेश आहे.
- चालणे-फिरणे आणि शारीरिक हालचालींशी संबंधित दिव्यांगत्व
- दृष्टीदोष
- श्रवणदोष
- वाचा आणि भाषणाशी संबंधित दिव्यांगत्व
- बौद्धिक दिव्यांगत्व
- न्यूरोलॉजिकल दिव्यांगत्व
- ऑटिझम
- मानसिक आजार
यामध्ये बुटकेपणाचे मूल्यांकन चालणे-फिरणे आणि शारीरिक हालचालींशी संबंधित दिव्यांगत्वाच्या श्रेणीत केले जाणार आहे.

प्रमाणपत्र प्रक्रियेला अधिक स्पष्टता
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ मध्ये बुटकेपणाचा समावेश यापूर्वीपासूनच दिव्यांगत्वाच्या प्रकारांमध्ये आहे. मात्र, नव्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांमुळे बुटकेपणाचे वैद्यकीय मूल्यांकन, दिव्यांगत्वाची टक्केवारी निश्चित करणे आणि प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेला अधिक स्पष्टता मिळणार आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे बुटकेपणा असलेल्या व्यक्तींना त्यांच्या वैद्यकीय स्थितीनुसार दिव्यांगत्वाचे प्रमाण निश्चित करून घेण्याचा मार्ग अधिक सुस्पष्ट होणार आहे. त्यामुळे शिक्षण, रोजगार आणि शासकीय योजनांमधील पात्रतेसंदर्भात हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.




