बांबू उचलण्याच्या कारणावरून वादाचा रक्तरंजित शेवट; लोखंडी रॉडने हल्ला, ३९ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या
जळगाव, मंडे टु मंडे न्युज || घरासमोरील लाकडी बांबू उचलल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट हत्येत झाल्याची धक्कादायक घटना धरणगाव शहरातील संजयनगर परिसरात घडली. या वादातून एका तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव किरण बोरसे (वय ३९, रा. विंचूर, जि. धुळे) असे आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसांनी संशयित आरोपी अजय मोरावकर याला अटक केली आहे.

बांबू उचलण्यावरून सुरू झाला वाद
प्राथमिक माहितीनुसार, धरणगाव शहरातील संजयनगर परिसरात घरासमोरील लाकडी बांबू उचलण्याच्या कारणावरून किरण बोरसे आणि संशयित आरोपी अजय मोरावकर यांच्यात वाद झाला. सुरुवातीला किरकोळ स्वरूपात असलेला हा वाद काही वेळातच चिघळला. संतापाच्या भरात संशयित आरोपीने किरण बोरसे यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले.
रुग्णालयात उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या किरण बोरसे यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांचे प्रयत्न सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचा शेवट हत्येत झाल्याने संजयनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संशयित आरोपीला अटक
या प्रकरणी सुनंदा महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत संशयित आरोपी अजय मोरावकर याला अटक केली. या घटनेमागील नेमके कारण आणि इतर बाबींचा धरणगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.






