‘बिसलेरी’ च्या पाण्याचा नमुना दोनदा तपासणीत असुरक्षित; ब्रोमेट आणि PAHs घटक आढळल्याचा FSSAI चा दावा! कंपनीविरोधात तपासाला मंजुरी
नवी दिल्ली.मंडे टु मंडे न्युज || देशातील प्रसिद्ध पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर ब्रँड बिसलेरीबाबत अन्नसुरक्षेशी संबंधित गंभीर प्रकरण समोर आले आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) बिसलेरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडच्या परिसरातून नियमित तपासणीसाठी घेतलेला पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरचा नमुना असुरक्षित घोषित केला आहे. विशेष म्हणजे, पहिल्या प्रयोगशाळेतील तपासणीत आक्षेपार्ह निष्कर्ष आल्यानंतर कंपनीने अपील केले. त्यानंतर रेफरल फूड लॅबोरेटरीमध्ये करण्यात आलेल्या दुसऱ्या तपासणीतही नमुना असुरक्षित असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती समोर आली आहे.

पहिल्या तपासणीत ब्रोमेटचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त
FSSAI च्या माहितीनुसार, कंपनीच्या परिसरातून गोळा करण्यात आलेला हा नमुना ‘पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर (मिनरल वॉटर वगळून)’ या श्रेणीतील होता. नियमित तपासणीदरम्यान प्रयोगशाळेने केलेल्या विश्लेषणात पाण्यातील ब्रोमेटचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आढळले. त्यामुळे अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ अंतर्गत हा नमुना असुरक्षित घोषित करण्यात आला.
अपीलनंतरच्या तपासणीतही PAHs घटकांची उपस्थिती
पहिल्या तपासणीच्या निष्कर्षांवर संबंधित फूड बिझनेस ऑपरेटरने (FBO) अपील केले होते. त्यानंतर नमुना रेफरल फूड लॅबोरेटरीकडे पाठवण्यात आला. तेथे करण्यात आलेल्या तपासणीतही नमुना असुरक्षित असल्याचे आढळले. या अहवालात पॉलीन्यूक्लियर अॅरोमॅटिक हायड्रोकार्बन्स (PAHs) या रासायनिक घटकांची उपस्थिती नोंदवण्यात आल्याचे FSSAI ने म्हटले आहे.

PAHs हा रासायनिक संयुगांचा समूह असून, त्यातील काही संयुगे कर्करोगकारक म्हणून ओळखली जातात. तसेच ब्रोमेटलाही संभाव्य कर्करोगकारक पदार्थ म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही तपासणी अहवालांमुळे अन्नसुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, या निष्कर्षांवरून बाजारातील बिसलेरीच्या सर्व बाटल्यांमध्ये असे घटक आहेत किंवा पाणी प्यायल्याने कर्करोग होतो, असा निष्कर्ष काढता येणार नाही.
बिसलेरीविरोधात तपासाला मंजुरी
दोन्ही प्रयोगशाळांच्या तपासणी अहवालांच्या आधारे अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ अंतर्गत बिसलेरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडविरोधात पुढील तपास करण्यास FSSAI ने मंजुरी दिल्याची माहिती आहे. या प्रकरणात संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार पुढील प्रक्रिया केली जाणार आहे.

बाटलीबंद पाण्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
लाखो ग्राहक बाटलीबंद पाणी सुरक्षित आणि शुद्ध असल्याच्या विश्वासाने त्याचा वापर करतात. अशा परिस्थितीत देशातील प्रसिद्ध ब्रँडच्या नमुन्याबाबत समोर आलेल्या या निष्कर्षांमुळे बाटलीबंद पाण्याच्या गुणवत्ता नियंत्रणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, या प्रकरणावर बिसलेरी कंपनीची अधिकृत भूमिका काय आहे, तसेच संबंधित नमुन्याच्या तपासणी अहवालांबाबत कंपनीकडून काय स्पष्टीकरण दिले जाते, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.





