भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राज्यात २७ जिल्ह्यांना यलो, ३ ठिकाणी ऑरेंज अलर्ट, उत्तर महाराष्ट्रातही पाऊस, जळगाव-नाशिकला यलो, धुळे-नंदुरबार ऑरेंज अलर्ट

मुंबई. मंडे टु मंडे न्युज | महाराष्ट्रात पावसाचे वातावरण कायम असून, १३ सप्टेंबर रोजी राज्यातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट, तर ३ ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर धुळे, नंदुरबार आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः घाट परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईसह कोकणातही पावसाची शक्यता
मुंबई आणि कोकण पट्ट्यात पावसाचे वातावरण कायम राहणार आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्यासह आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची हजेरी
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे घाटमाथा, सातारा आणि सातारा घाटमाथा या भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर कोल्हापूर, कोल्हापूर घाटमाथा, सांगली आणि सोलापूर येथे कोणताही अलर्ट नसला तरी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांना यलो अलर्ट
मराठवाड्यातही पावसाचे वातावरण राहणार असून, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि हिंगोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. काही भागांत पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची स्थिती आणि स्थानिक हवामानाचा अंदाज घेऊन शेतीतील कामांचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

विदर्भात अनेक जिल्ह्याना पावसाचा इशारा                  विदर्भात अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.

घाटमाथ्यावरील प्रवासात विशेष खबरदारी
राज्यातील सर्वच भागांत मुसळधार पाऊस पडेल असे नाही. यलो अलर्ट असलेल्या जिल्ह्यांमध्ये स्थानिक परिस्थितीनुसार पावसाचा जोर कमी-जास्त होऊ शकतो. मात्र, ऑरेंज अलर्ट असलेल्या भागांत नागरिकांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. घाटमाथा, अतिवृष्टीची शक्यता असलेले भाग तसेच धोकादायक ठिकाणी प्रवास करताना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!