भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

हिंगलाज माता चित्रपटातील भक्तिमय आरती अल्बमचे दिमाखात प्रकाशन : ३१ ऑगस्टला ग्रँड प्रीमियर

सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांच्या सुमधुर स्वरातील आरती भक्तांच्या भेटीला

मुंबई. मंडे टु मंडे न्युज | आदिशक्ती हिंगलाज माता यांच्या चरणी भक्तिभावाने समर्पित करण्यात आलेल्या आरती व भक्तिगीतांच्या विशेष अल्बमचे दिमाखात प्रकाशन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांच्या सुमधुर स्वरांनी सजलेली हिंगलाज माता आरती भक्तांच्या भेटीला आली असून, या भक्तिमय निर्मितीमुळे हिंगलाज माता भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ऑरेंज म्युझिक प्रायव्हेट लिमिटेड या म्युझिक कंपनीच्या माध्यमातून हा अल्बम प्रसिद्ध करण्यात आला असून, ३१ ऑगस्ट रोजी ग्रँड प्रीमियर आयोजित करण्यात आले होता.


भावसार ब्रदर्स फिल्म प्रायव्हेट लिमिटेड या बॅनरखाली या भक्तिमय निर्मितीची निर्मिती करण्यात आली आहे. निर्माते योगेश भावसार, दिग्दर्शक सुरेश झाडे आणि कोरिओग्राफर प्रवीण शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगलाज मातेच्या भक्तीला समर्पित हा अल्बम साकारण्यात आला आहे. हिंगलाज माता आरती व भक्तिगीतांचे चित्रीकरण विविध ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांच्या पवित्र वातावरणात करण्यात आले आहे.

यामध्ये इंदूर येथील हिंगलाज माता मंदिर, प्रसिद्ध खजराना गणेश मंदिर, फैजपूर येथील प्राचीन हिंगलाज माता मंदिर, हिंगलाजपूर येथील ज्वालामुखी हिंगलाज मंदिर तसेच अमरावती जिल्ह्यातील पुरातन हिंगलाजपूर हिंगलाज माता मंदिर या प्रमुख धार्मिक स्थळांचा समावेश आहे. त्यामुळे या निर्मितीला धार्मिक आणि आध्यात्मिकतेसोबतच ऐतिहासिक स्थळांचे सुंदर दृश्यवैभव लाभले आहे. या भक्तिमय निर्मितीसाठी कॅमेरामन अविनाश पठारे, प्रदीप खारवे आणि आविष्कार भावसार यांनी विशेष योगदान दिले आहे. तसेच डॉ. यशश्री झाडे, अतुल लोणसणे, भास्कर जुनगडे, अनिल मावळे, केतन किरंगे, संदीप पाटील, किशोर पाटील, कलीम मण्यार, श्री साधनकर, अर्चना भावसार यांच्यासह अनेकांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले आहे. बिदर भावसार क्षत्रिय महिला मंडळ, ढेपळे परिवार आणि केरहाळा ग्रामस्थ यांचाही या निर्मितीत सहभाग राहिला आहे. सर्वांच्या अथक परिश्रम व सहकार्यामुळे हिंगलाज मातेच्या भक्तीला समर्पित हा अल्बम आकाराला आला आहे.

याबाबत निर्माते योगेश भावसार यांनी सांगितले की, हिंगलाज मातेची आरती तसेच या माध्यमातून साकारलेली सहा भक्तिगीते आणि नामजप जास्तीत जास्त हिंगलाज माता सेवक व भक्तांपर्यंत पोहोचावेत, हा या निर्मितीमागील मुख्य उद्देश आहे. हिंगलाज मातेच्या भक्तीचा आणि शक्तीचा संदेश संगीत व चित्रकलेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचविण्याचा हा एक नम्र प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, हिंगलाज माता या हिंदी चित्रपटाची निर्मितीही भावसार ब्रदर्स फिल्म प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली करण्याचा मानस असल्याचे निर्माते योगेश भावसार व दिग्दर्शक सुरेश झाडे यांनी सांगितले. या आगामी चित्रपटासाठी आगळेवेगळे व नाविन्यपूर्ण विषय मांडण्यासोबतच सुप्रसिद्ध अभिनेत्यांना सहभागी करून घेण्याची तयारी सुरू आहे. चित्रपटाच्या लोकेशन तसेच कलाकारांच्या निवडीची प्रक्रिया योगेश भावसार आणि दिग्दर्शक सुरेश झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, त्यांना सहकाऱ्यांचेही सहकार्य लाभत आहे.


विशेष म्हणजे या आगामी चित्रपटासाठी तांत्रिक क्षेत्रातील तसेच अभिनय क्षेत्रातील नवोदित आणि गुणवान कलाकारांना संधी देण्यात येणार असल्याचे योगेश भावसार व सुरेश झाडे यांनी सांगितले. हिंगलाज मातेच्या भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिकतेला कलात्मक रूप देणारा हा आरती अल्बम भक्तांसाठी निश्चितच एक आगळा आध्यात्मिक अनुभव ठरणार आहे. मातेच्या जयघोषात या भक्तिमय कलाकृतीचे स्वागत करण्यासाठी भाविक उत्सुक आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!