सरकारी फाईल ७ दिवसांपेक्षा अधिक प्रलंबित ठेवल्यास कारवाई ; राज्य सरकारचा मोठा निर्णय
मुंबई. मंडे टू मंडे न्यूज | शासकीय कामकाजातील दिरंगाईला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारी कार्यालयातील कोणतीही फाईल एका अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडे कामकाजाच्या सात दिवसांपेक्षा अधिक काळ प्रलंबित ठेवता येणार नाही, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. विहित मुदतीत काम पूर्ण न करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शासकीय प्रकरणांच्या विलंबाबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात ११ सप्टेंबर रोजी शासन परिपत्रक जारी केले आहे.
तातडीच्या फाईलींना प्राधान्य
नव्या निर्देशांनुसार तातडीच्या स्वरूपाची फाईल शक्यतो त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे तातडीच्या प्रकरणांमध्ये अनावश्यक विलंब टाळण्याची जबाबदारी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर असणार आहे.
एकाच विभागातील फाईलसाठी ४५ दिवसांची मुदत
एकाच विभागात निर्णय घ्यायचा असलेल्या फाईलवर ४५ दिवसांच्या आत निर्णय घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर दुसऱ्या विभागाकडे पाठवावी लागणारी फाईल तीन महिन्यांच्या आत निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुदत पाळली नाही तर शिस्तभंगाची कारवाई
विहित मुदतीत काम पूर्ण न करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. तसेच विलंबास प्रतिबंध अधिनियमाच्या कलम १० अंतर्गतही कारवाई करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.
न्यायालयाच्या नाराजीनंतर शासनाचे निर्देश
जिल्हा परिषदांमधील निवेदने आणि तक्रारींवर सात दिवसांच्या मुदतीत कार्यवाही न झाल्याच्या प्रकरणांवर नागपूर खंडपीठाने नाराजी व्यक्त केली होती. संबंधित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश झाल्याचा उल्लेखही शासन परिपत्रकात करण्यात आला आहे.
प्रलंबित प्रकरणांचा दरमहा आढावा
प्रलंबित अर्ज, निवेदने आणि प्रकरणांचा विभागप्रमुखांनी दर महिन्याला आढावा घ्यावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. शासकीय कामकाजात होणारी दिरंगाई कमी करण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत.
या निर्णयामुळे सरकारी कार्यालयांमध्ये फाईल प्रलंबित ठेवण्याच्या पद्धतीला आळा बसून नागरिकांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

