बामणोद जवळ भीषण अपघात! पाडळसेतील २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू; एक जखमी
फैजपूर, मंडे टु मंडे न्युज। यावल तालुक्यातील बामणोद गावाजवळ दुचाकींची जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पाडळसे येथील २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक तरुण जखमी झाला. गुरुवारी घडलेल्या या दुर्घटनेमुळे पाडळसे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विरोदा येथे जयंतीची मिरवणूक पाहण्यासाठी जात असताना अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, पाडळसे (ता. यावल) येथील रोशन गोपाळ कोळी (वय २६) आणि सुपडू उर्फ सदाशिव गोपाळ कोळी (वय २२) हे दोघे दुचाकी क्रमांक एमएच १९ ईएस ३८७५ ने विरोदा येथे श्री महर्षी वाल्मिकी जयंतीची मिरवणूक पाहण्यासाठी जात होते.
दरम्यान, बामणोद गावाजवळील पेट्रोल पंपाच्या अलीकडे, डॉ. जगदीश यांच्या शेतासमोर त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. या धडकेत रोशन गोपाळ कोळी याचा जागीच मृत्यू झाला, तर सुपडू उर्फ सदाशिव कोळी हा जखमी झाला.
या अपघातप्रकरणी पांडुरंग कोळी यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार संजय झाल्टे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.


