भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राइम

ब्रेकिंग : रावेर मध्ये वनरक्षकाला २० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले! लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई

रावेर, मंडे टु मंडे न्युज || शेतीकामासाठी धरणातील गाळ काढल्याच्या मोबदल्यात २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी रावेर वनपरिक्षेत्रातील वनरक्षक जगदीश काशिनाथ जगदाळे (वय २७) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जळगाव पथकाने बुधवारी (दि. २८ ऑक्टोबर) रंगेहात पकडले. रावेर ते बऱ्हाणपूर रोडवरील साईनाथ ज्यूस सेंटर येथे पंचांसमक्ष ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

नेमके प्रकरण काय?
या प्रकरणातील तक्रारदार हे रावेर येथील अर्थमूव्हर्स एजन्सीचे व्यावसायिक असून, त्यांच्याकडे जेसीबी मशीन आहे. तक्रारदारांच्या परिचित व्यक्तीने स्वतःच्या तसेच नातेवाईकांच्या नावे रावेर येथील मंगरूळ धरणातून शेतीकामासाठी गाळ वाहून नेण्याचा परवाना पाटबंधारे उपविभाग, रावेर या कार्यालयाकडून घेतला होता.

संबंधित ठिकाण हे वनरक्षक जगदीश जगदाळे यांच्या कार्यक्षेत्रात येत होते. तक्रारदार यांनी जेसीबी मशीनच्या साहाय्याने धरणातील गाळ काढला होता. या कामाच्या मोबदल्यात जगदाळे यांनी तक्रारदारांकडे २० हजार रुपये, तर त्यांच्या परिचित व्यक्तीने ट्रॅक्टरद्वारे गाळाची वाहतूक केल्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपये, अशी एकूण ५० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.

तक्रारीनंतर लाच मागणीची पडताळणी
या तक्रारीच्या अनुषंगाने २८ ऑक्टोबर रोजी रावेर शहरातील छोरिया मार्केट परिसरातील एका चहाच्या हॉटेलमध्ये पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. या वेळी वनरक्षक जगदाळे यांनी तक्रारदारांच्या जेसीबी मशीनद्वारे गाळ काढल्याच्या मोबदल्यात २० हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे एसीबीच्या तपशिलात नमूद आहे.

त्यानंतर त्याच दिवशी रावेर ते बऱ्हाणपूर रोडवरील साईनाथ ज्यूस सेंटर येथे तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना जगदाळे यांना पथकाने पकडले.

गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
या प्रकरणातील संबंधित वनरक्षकाला ताब्यात घेण्यात आले असून, अटकेसंदर्भातील पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती देण्यात आली. रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

ही कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक हेमंत नागरे आणि पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्यासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!