भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळ

भुसावळात फटाक्यांसारखा आवाज करणाऱ्या पाच बुलेटचे सायलेन्सर जप्त! २२ वाहनांवर कारवाई, १५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज || शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासह कर्णकर्कश आवाज करणाऱ्या वाहनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी शहर वाहतूक शाखेने मंगळवारी (दि. २७ ऑक्टोबर) हंबर्डीकर चौक परिसरात विशेष मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान फटाके फुटल्याप्रमाणे मोठा आवाज करणाऱ्या पाच बुलेट मोटारसायकलींचे मॉडिफाईड सायलेन्सर जप्त करण्यात आले. तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांकडून एकूण १५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

हंबर्डीकर चौकात नाकाबंदी करून तपासणी
शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल भंडारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मंगळवारी सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० या वेळेत हंबर्डीकर चौक परिसरात नाकाबंदी केली. यावेळी वाहनांची तपासणी करून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

शहरातील काही दुचाकीस्वार मॉडिफाईड सायलेन्सरचा वापर करून मोठ्या आवाजात वाहने चालवतात. अशा वाहनांमुळे ध्वनिप्रदूषण वाढण्याबरोबरच नागरिकांनाही त्रास सहन करावा लागतो. विशेषतः बाजारपेठा, चौक आणि वर्दळीच्या रस्त्यांवर या कर्णकर्कश आवाजाचा नागरिकांना मनस्ताप होतो.

या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेने केलेल्या तपासणीत मोठा आवाज करणाऱ्या पाच बुलेट मोटारसायकली आढळून आल्या. संबंधित वाहनचालकांना प्रत्येकी एक हजार रुपये याप्रमाणे एकूण पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. तसेच मोठा आवाज करणारे सायलेन्सर पोलिसांनी ताब्यात घेतले.

२२ वाहनांवर कारवाई; १५ हजार ५०० रुपयांचा दंड
मॉडिफाईड सायलेन्सर वापरणाऱ्या पाच बुलेट मोटार सायकलींवरील कारवाईतून पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. याशिवाय वाहतुकीच्या विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अन्य १७ वाहनांवर कारवाई करून १० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

अशा प्रकारे एकूण २२ वाहनांवर कारवाई करत १५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी वाहतूक शाखेने केलेल्या या कारवाईची चर्चा सुरू आहे.

ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक राहुल भंडारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात पीएसआय खर्चाने, एएसआय वानखेडे, हेड कॉन्स्टेबल वानखेडे, हेड कॉन्स्टेबल विटकर, महिला हेड कॉन्स्टेबल अहिरे आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत चव्हाण यांचा समावेश होता.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!