ब्रेकिंग : पुन्हा एकदा बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी मिळाल्याने मोठी खळबळ ; सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर
मुंबई.मंडे टु मंडे न्युज ||देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पुन्हा एकदा बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मुंबईच्या महापौर कार्यालयासह बँक, न्यायालय, प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन यांचा बंगला, महालक्ष्मी रेसकोर्स आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्याचा इशारा धमकीच्या ई-मेलमधून देण्यात आला आहे. या घटनेनंतर मुंबईतील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी १० वाजून १२ मिनिटांनी हा धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. त्यामध्ये मुंबईतील विविध महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या ई-मेलमध्ये मुंबई महापौर कार्यालयाचाही स्पष्ट उल्लेख असल्याने महानगरपालिका प्रशासनाने तातडीने सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली.
बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी
धमकीचा ई-मेल मिळताच संबंधित ठिकाणी सुरक्षा यंत्रणांनी सतर्कता वाढवली. महापौर कार्यालय परिसरात बॉम्बशोधक व नाशक पथकाकडून कसून तपासणी करण्यात आली. मात्र, प्राथमिक तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही. त्यामुळे महापौर कार्यालयातील नियमित कामकाज सुरू असल्याची माहिती आहे.
तिसऱ्यांदा धमकीचा ई-मेल
विशेष म्हणजे, महापौर कार्यालयाला अशा प्रकारची धमकी मिळण्याची ही पहिलीच घटना नाही. गेल्या काही दिवसांत यापूर्वीही अशाच स्वरूपाचे ई-मेल प्राप्त झाले होते. आता पुन्हा धमकी मिळाल्याने सुरक्षा यंत्रणांसमोरील आव्हान वाढले आहे.
धमकीच्या ई-मेलमध्ये ‘खलिस्तान बोलेगा, मुंबई जिंदाबाद’ असा मजकूरही नमूद असल्याचे समोर आले आहे. या ई-मेलचा नेमका स्रोत कोणता, तो कोणी पाठवला आणि त्यामागील उद्देश काय, याचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलीस व संबंधित तपास यंत्रणांकडून तपास सुरू आहे.
दरम्यान, तपासणीत अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नसली, तरी धमकीचे गांभीर्य लक्षात घेऊन महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कायम सतर्क ठेवण्यात आली आहे. वारंवार येणाऱ्या अशा धमकीच्या ई-मेलमागील सूत्रधारांचा शोध घेणे हे पोलिसांसमोरील महत्त्वाचे आव्हान ठरणार आहे.


