Breaking News : जळगाव जिल्हा गोळीबाराने हादरला! तरुणावर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार ; प्रकृती चिंताजनक
जळगाव . मंडे टु मंडे न्युज || जळगाव जिल्ह्यात गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली असून, भडगाव तालुक्यातील कजगाव येथे कामावर जाणाऱ्या एका तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २४ नोव्हेंबर) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. गोडगाव रोड परिसरात झालेल्या या हल्ल्यात जयेश नाना धोबी (पवार) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे कजगावसह परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

कामावर जात असतानाच साधला निशाणा
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जयेश नाना धोबी (पवार) हा पारोळा रस्त्यावरील एका सोलर कंपनीत कामाला आहे. मंगळवारी सायंकाळी तो नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी घरातून निघाला होता. दरम्यान, गोडगाव रोड परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी त्याला लक्ष्य करत अचानक गोळीबार केला. या हल्ल्यात जयेश गंभीर जखमी झाला. गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ जखमी जयेशला रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला पुढील उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले.

हल्ल्यामागचे कारण अद्याप गुलदस्त्यात!
जयेशवर गोळीबार करणारे हल्लेखोर नेमके कोण होते? त्यांनी त्याला लक्ष्य का केले? हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला की यामागे अन्य काही कारण आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, गोळीबारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांच्या तपासानंतरच या हल्ल्याचे कारण समोर येण्याची शक्यता आहे.

भडगाव पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेण्यासह घटनेमागील कारणांचा उलगडा करण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. भर सायंकाळी कामावर जाणाऱ्या तरुणावर गोळीबार झाल्याने कजगाव परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, गंभीर जखमी जयेशच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात असून, हल्लेखोरांचा शोध घेऊन या घटनेचा छडा लावण्याचे मोठे आव्हान भडगाव पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. या प्रकरणातील पुढील तपासाकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.





