भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरराजकीय

दुष्काळाच्या सावटात वाढदिवसाचा जल्लोष नको; आ.चंद्रकांत पाटील यांची संवेदनशील भूमिका, शुभेच्छांसाठी प्रत्यक्ष येऊ नये; कार्यकर्त्यांनी समाजोपयोगी उपक्रम राबवावेत !

मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी | मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघासह जळगाव जिल्ह्यावर सध्या दुष्काळाचे सावट असून, अस्मानी संकटामुळे बळीराजा मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिक संकटाचा सामना करीत असताना स्वतःचा वाढदिवस जल्लोषात साजरा करणे योग्य ठरणार नाही, अशी संवेदनशील भूमिका मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी घेतली आहे. त्यामुळे यंदा वाढदिवसानिमित्त कोणताही मोठा कार्यक्रम, सत्कार अथवा अनावश्यक खर्च न करता समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून हा दिवस साजरा करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना केले आहे.
आमदार चंद्रकांत पाटील यांचा १४ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. मात्र, मतदारसंघातील सध्याची परिस्थिती पाहता वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा जल्लोष, मोठे कार्यक्रम किंवा अनावश्यक खर्च टाळण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्याऐवजी वाढदिवसाचा दिवस समाजातील गरजू घटकांसाठी मदतीचा हात देत साजरा करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

याबाबत आ. चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, “आज माझा बळीराजा अस्मानी संकटांशी सामना करीत आहे. पाऊस-पाण्याची अनिश्चितता, शेतीसमोरील अडचणी आणि आर्थिक संकटामुळे शेतकरी बांधव त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत माझा वाढदिवस उत्साहात साजरा करणे मला योग्य वाटत नाही. मायबाप जनतेचे प्रेम, शुभेच्छा आणि आशीर्वाद हेच माझ्यासाठी सर्वात मोठे भांडवल आहे.”
तसेच १४ सप्टेंबर रोजी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी कुणीही प्रत्यक्ष भेटीसाठी येऊ नये, असे आवाहनही आमदार पाटील यांनी केले आहे. वाढदिवसाच्या दिवशी ते बाहेरगावी राहणार असल्याने कार्यकर्ते, पदाधिकारी आणि हितचिंतकांनी भेटीसाठी येण्याऐवजी आपल्या परिसरातच समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे.

आ. पाटील यांनी मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे, गरजू नागरिकांना आवश्यक वस्तूंचे वाटप करणे, अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे, रुग्णांना उपचारासाठी आवश्यक सहकार्य करणे तसेच परिसराच्या गरजेनुसार विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे आवाहन केले आहे.

त्यामुळे यंदाचा वाढदिवस हा व्यक्तिगत आनंदाचा सोहळा न ठरता सामाजिक बांधिलकी जपणारा दिवस ठरावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. संकटाच्या काळात जनतेसोबत उभे राहणे, शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घेणे, त्यांच्या प्रश्नांसाठी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करणे आणि गरजूंच्या मदतीला धावून जाणे, हाच वाढदिवस साजरा करण्याचा खरा मार्ग असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

आमदार चंद्रकांत पाटील यांची भूमिका
“माझा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य आणा!”
दुष्काळाच्या सावटात शेतकरी आर्थिक संकटात असताना वाढदिवसाचा जल्लोष करणे योग्य नाही. त्यामुळे १४ सप्टेंबर रोजी शुभेच्छा देण्यासाठी प्रत्यक्ष भेटीसाठी येऊ नये. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी हार-तुरे, सत्कार आणि अनावश्यक खर्च करण्याऐवजी विद्यार्थ्यांना मदत करावी, गरजूंच्या अडचणी दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा, शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे राहावे, रुग्णांना उपचारासाठी सहकार्य करावे आणि आपल्या परिसरात समाजोपयोगी उपक्रम राबवावेत. जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद हेच माझ्यासाठी सर्वात मोठे गिफ्ट आहे. आजच्या कठीण परिस्थितीत जनतेच्या उपयोगी पडणे, हाच माझ्या वाढदिवसाचा खरा आनंद आहे.

वाढदिवसानिमित्त गर्दी करू नये…..

आमदार चंद्रकांत पाटील हे १४ सप्टेंबर रोजी वैयक्तिक कारणास्तव बाहेरगावी असल्याने मतदारसंघात उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगर शहरात कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला नाही. कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक व नागरिकांनी शुभेच्छा देण्यासाठी शहरात किंवा त्यांच्या निवासस्थानी येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून गरजूंसाठी समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!