पिक विमा घोटाळा : यावल तालुक्यातील ८ सीएससी केंद्र चालकांवर गुन्हा, १६ ते १७ कोटींवर डल्ला, बोगस पिक विमा धारक रडारवर
यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | पिक विमा योजने अंतर्गत फळ पिक विम्याच्या नावाखाली बनावट कागदपत्रांद्वारे १६ ते १७ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार यावल तालुक्यात उघडकीस आला. यासंदर्भात यावल तालुका कृषी अधिकारी यांनी यावल तालुक्यातील यावल येथील जयवंत राजेंद्र माळी, बापू निंबा पाटील, सुदर्शन अभिमन्यू पाटील (दहिगाव), विजय निंबा बाविस्कर (साकळी), शुभम राजेंद्र तावडे (निमगाव), विठ्ठल गोरख पाटील (मनवेल), तुषार चंद्रकांत पिंपळे (भालोद), दीपक गोविंदा महाजन (मोहराळा) या ८ सीएससी केंद्र चालकांविरोधात यावल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकारणींसह बोगस पिक विमा धारक शेतकरी वर्तुळात मोठी खळबळ उडाली. ही मोठी साकाळी असून यात काही शेतकरी, ते विमा उतरवण्या पर्यंतचे तलाठी,विमा एजंट, कृषी विभागाने अधिकारी/ कर्मचारी, दलाल, बोगस शेतकरी व csc केंद्र चालकांचा समावेश आहे. असाच प्रकार रावेर, मुक्ताईनगर मधेही उघडकीस आला.
यावल तालुका कृषी अधिकारी भरत वारे यांनी यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, यावल तालुक्यात पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पिक विमा आंबिया बहार योजनेअंतर्गत योजनांची अंमलबजावणी ही भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत करण्यात येत आहे. तालुक्यात सन २०२५-२६ मध्ये केळी पिकासाठी प्राधान्याने फळपिक विम्यासाठी शेतकऱ्यांमार्फत सहभाग नोंदविला जातो. पिक विमा अर्ज पीक विमा पोर्टलद्वारे अर्जदार, शेतकरी ऑनलाइन सीएससी सेंटर, बँक किंवा स्वतः संबंधित पीक विमा कंपनीकडे सादर करीत असतात. पीक विमा योजनेत प्रती हेक्टरी विमा हप्ता शेतकरी हिस्सा रुपये आठ हजार पाचशे, राज्याचा हिस्सा २८ हजार ५० रुपये, व केंद्राचा २१ हजार २५० रुपये आहे. असा एकूण रुपये ५७ हजार ८०० रुपये विमा हप्ता आहे. व विमा संरक्षित रक्कम रुपये १ लाख ७० हजार प्रति हेक्टर अशी आहे. अर्जदार शेतकऱ्यांनी सीएससी सेंटरवर जाऊन ज्या क्षेत्रावर केळी
पीक विमा काढायचा आहे त्याचा सातबारा उतारा गट क्रमांकसह आधार कार्ड, बँकेचे पासबुक, स्वतःचे घोषणापत्र, ज्या क्षेत्रावर केळीची लागवड केलेली आहे त्या क्षेत्राचा जिओ टॅग फोटो विमा हप्त्याची पावती त्याचप्रमाणे भाडे तत्त्वावर किंवा कुळाने असलेल्या शेतकऱ्याचा करारनामा सहमती पत्र शासन निर्णयानुसार सीएससी सेंटर जनसुविधा केंद्र यांची जबाबदारी व कर्तव्य आहेत.
राष्ट्रीय पीक विमा पोर्टलवर भरण्यात आलेली शेतकऱ्यांची माहिती व सादर केलेले कागदपत्रे यामध्ये चुका आढळून आल्यास संबंधित सीएससी सेवा केंद्र जबाबदार असेल व अशा चुकांमुळे देय पीक विमा दाव्यांना जबाबदार राहील. सहभाग नोंदविलेले शेतकरी काही चुकात छोटी अथवा विपरीत बाबीमुळे योजनेच्या फायद्यापासून वंचित राहणार नाही याची जन सुविधा केंद्रावरील गाव पातळी सेवक (व्हीएलई) याची खात्री करणे व्हीएलई यांच्या सेवेतील त्रुटी, गैरव्यवहार यामुळे योजनेच्या फायद्यापासून शेतकरी वंचित राहिल्यास त्याचा अहवाल सादर करून त्यांच्यावर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई केली जाते.
आदी कारणावरून यावल तालुक्यातील यावल येथील जयवंत राजेंद्र माळी, बापू निंबा पाटील, सुदर्शन अभिमन्यू पाटील (दहिगाव), विजय निंबा बाविस्कर (साकळी), शुभम राजेंद्र तावडे (निमगाव), विठ्ठल गोरख पाटील (मनवेल), तुषार चंद्रकांत पिंपळे (भालोद), दीपक गोविंदा महाजन (मोहराळा) या आठ सीएससी केंद्र चालकांविरुद्ध यावल पोलीस स्टेशनला गुन्हा नंबर ८० / २०२६ दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे करीत आहे. सीएससी केंद्र चालकांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने तालुक्यातील राजकारणात शेतकरी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

