वाळू बंदी असूनही शासनाचे झोपेचे सोंग? रावेर तालुक्यात सर्रास वाळूची अवैध तस्करी
सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर सर्वत्र बंदी असतानाही, रावेर तालुक्यात मुबलक वाळू कुठून आणि कशी येते, हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे. रावेर तालुक्यातील पाल, तापी काठ ,निंभोरा सीम परिसरातून मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी बिनबोभाट केली जात आहे.या अवैध वाळू तस्करीने शासनाचा महसूल बुडत आहे.
रावेर तालुक्यातील सुकी नदी आणि तापी नदी पात्रातून दररोज मध्यरात्रीनंतर हातनूर धरण, उदळी, तासखेडा, मस्कावद, सावदा आणि मोठा वाघोदा मार्गाने शेकडो ब्रास वाळू ट्रॅक्टर, ट्रक आणि डंपरद्वारे बिनधास्तपणे वाहून नेली जाते. या वाहनांना कोणताही कायदेशीर परवाना नसून, महसूल विभागाच्या नजरेखाली अवैध वाळू तस्करीचा मोठा गोरखधंदा सुरु आहे.
त्याच प्रमाणे पाल परिसरातून आजुबाजूच्या परिसरातून खिरोदा, मार्गे सावखेडा व रोझोदा , कोचुर मार्गे सावदा व परिसरात पाल येथील तस्करांकडून केली जात आहे. तसेच पाल उटखेडा मार्गे रावेर परिसरात मोठी वाळूची अवैध वाहतूक सुरू आहे.
तसेच बेकायदेशीर वाळू तस्करी? निंभोरासिम, ऐनपूर, बलवाडी, सिंगत, सिंगनूर, दसनूर, वडगाव, चिनावल, कुंभारखेडा, लोहारा, खिरोदा, मोठा वाघोदा, सावदा, मस्कावद आणि इतर परिसरातून ही बेकायदेशीर वाहतूक सर्रास सुरू आहे. पाल घाट, चिनावल-सावदा, मस्कावद-सावदा रेल्वे स्टेशन मार्ग हे वाहतुकीचे प्रमुख रस्ते झाले आहेत.
तस्करांचा कार्यपद्धतीही अत्यंत संगठित आहे. रात्रीच्या सुमारास, तस्कर आधी मोटारसायकल किंवा चारचाकी वाहनाने परिसराची रेकी करतात. पोलीस आणि स्थानिक यंत्रणाच्या हालचालीवर लक्ष ठेवून, सिग्नल मिळताच मोठ्या वाहनांना बोलावले जाते आणि नदीपात्रातून वाळू उपसली जाते. हे सर्व काम संध्याकाळी सात आठ वाजे पासून सुरू करतात तर मध्यरात्री १२ ते सकाळी ६ या वेळेत वाळू टाकण्याचे काम पार पडते.
जर वाळू बंदी असेल, तर बांधकामांसाठी लागणारी इतकी वाळू कुठून येते? कोणते स्रोत वापरले जातात? आणि इतक्या मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक स्थानिक यंत्रणांच्या नजरेआड कशी होते?संबंधित कर्मचारी – अधिकाऱ्यांना महसूल विभाग या संदर्भात माहिती नाही का? की जाणून बुजून दुर्लक्ष्य करतात? असे अनेक प्रश्न शेतकरी व नागरिक उपस्थित करत आहेत.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा