शिक्षण क्षेत्र हादरले! १६० कोटींच्या शालार्थ घोटाळ्यात जळगाव जिल्ह्यातील ६६ संस्था दोषारोपपत्रात ; ८४९ जण तपासाच्या रडारवर
जळगाव.मंडे टु मंडे न्युज | राज्यभर गाजत असलेल्या तब्बल १६० कोटी रुपयांच्या शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात जळगाव जिल्ह्याचा मोठा सहभाग समोर आला आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) सुमारे ११ हजार पानांचे दोषारोपपत्र नाशिकरोड न्यायालयात दाखल केले आहे.
या दोषारोपपत्रात राज्यातील १११ शिक्षण संस्थांचा समावेश असून, त्यापैकी तब्बल ६६ संस्था जळगाव जिल्ह्यातील आहेत. या प्रकरणातील एकूण १,१९९ संशयितांपैकी ८४९ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाध्यक्ष आणि सचिव जळगाव जिल्ह्यातील असल्याचे तपासातून समोर आले आहे. त्यामुळे या घोटाळ्याच्या तपासाचा केंद्रबिंदू जळगाव जिल्हा ठरला आहे.
नऊ तालुक्यांतील संस्थांचा समावेश
तत्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन मुरलीधर उपासनी यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या शालार्थ आदेशांच्या यादीत जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील संस्थांचा समावेश असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
अमळनेर, चाळीसगाव, जामनेर, भडगाव, पारोळा, रावेर, एरंडोल, भुसावळ आणि चोपडा यांसह जिल्ह्यातील ६६ संस्थांमधील २२८ शिक्षक व कर्मचाऱ्यांचे शालार्थ आदेश काढण्यात आल्याचे दोषारोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
१५ जणांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले
या प्रकरणातील संशयितांमध्ये काही शिक्षण विभागातील तत्कालीन अधिकारी तसेच संस्थांशी संबंधित व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत १५ संशयितांचे अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले असल्याने प्रकरणातील संबंधितांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.वसंशयित आरोपी आणि सेवानिवृत्त तत्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनीही जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली असून, त्यांच्या अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. भाजप नेते संजय गरुड यांचे नावही या प्रकरणाच्या तपासात समोर आले असून, ते सध्या रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले आहे.
२७ साक्षीदारांची पडताळणी
दोषारोपपत्रासोबत माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, ठाणे अंमलदार, पंच आणि तपास अधिकाऱ्यांसह २७ साक्षीदारांची पडताळणी विवरणपत्रे जोडण्यात आली आहेत. तसेच तत्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांच्या कार्यकाळातील स्वाक्षरीच्या याद्यांचाही तपासात समावेश करण्यात आला आहे. या याद्यांमध्ये नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील विविध शिक्षण संस्थांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.
उत्तर महाराष्ट्रातील २३३ शाळा तपासाच्या कक्षेत
एसआयटीच्या तपासात उत्तर महाराष्ट्रातील तब्बल २३३ शाळांमधील ८२१ शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक आणि सचिव, तसेच शिक्षण विभागातील तत्कालीन अधिकारी नितीन बच्छाव आणि भाऊसाहेब चव्हाण यांच्यासह एकूण १,१९९ संशयित निष्पन्न झाल्याचे दोषारोपपत्रातून स्पष्ट झाले आहे.
शालार्थ आयडी आणि बनावट मान्यतांच्या माध्यमातून शासनाच्या निधीवर डल्ला मारल्याचा आरोप असलेल्या या प्रकरणात एसआयटीने पुरावे संकलित करण्यासह संबंधितांची चौकशी वेगाने सुरू केली आहे. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणात आणखी कोणाची नावे समोर येतात आणि कोणावर कारवाई होते, याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.


