रावेर–पुनखेडा–पातोंडी रस्त्याच्या निकृष्ट : पहिल्याच पावसात रस्त्याची दुरवस्था, कामाची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करा, तहसीलदारांना निवेदन
रावेर. मंडे टु मंडे न्युज | रावेर–पुनखेडा–पातोंडी या मार्गावरील डांबरीकरणाचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले असतानाच अल्पावधीत आणि पहिल्याच पावसात रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याचा आरोप पुनखेडा व पातोंडी येथील ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची तातडीने स्वतंत्र व निष्पक्ष तांत्रिक चौकशी करून दोषींवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी रावेर तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याच्या अनेक ठिकाणी डांबर उखडणे, खड्डे पडणे, रस्त्याचा पृष्ठभाग खराब होणे यासह विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे रस्त्याच्या कामाची गुणवत्ता, वापरण्यात आलेले साहित्य, कामाची जाडी, बेसची तयारी, कामाची पद्धत, तांत्रिक मानके तसेच संबंधित विभागाकडून करण्यात आलेली देखरेख याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा मार्ग नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, वाहनचालक तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन वापराचा असल्याने रस्त्याची झालेली दुरवस्था ही सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर बाब असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे.
काँक्रिटीकरणाच्या कामावरही गुणवत्ता नियंत्रणाची मागणी
पुनखेडा व पातोंडी गावांमध्ये सुरू असलेली अथवा प्रस्तावित काँक्रिटीकरणाची कामे शासनाच्या निर्धारित तांत्रिक निकषांनुसार दर्जेदार व टिकाऊ पद्धतीने करण्यात यावीत, अशीही मागणी करण्यात आली आहे. काँक्रिटीकरणासाठी वापरण्यात येणारे साहित्य, काँक्रिटची जाडी व मजबुती, मिश्रणाचे प्रमाण, बेसची तयारी, लेव्हल तसेच इतर तांत्रिक बाबींच्या आवश्यक गुणवत्ता चाचण्या करण्यात याव्यात आणि त्यांचे अहवाल उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. निकृष्ट दर्जाचे काँक्रिटीकरण आढळल्यास संबंधित काम तातडीने थांबवून दोष दूर केल्याशिवाय कामास अंतिम मंजुरी अथवा संबंधित देयक अदा करू नये, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दोषींवर कारवाई व खर्च वसुलीची मागणी
रावेर–पुनखेडा–पातोंडी रस्त्याची वरिष्ठ तांत्रिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तातडीने प्रत्यक्ष पाहणी करावी, कामाची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करावी आणि रस्ता अल्पावधीत खराब होण्याची नेमकी तांत्रिक कारणे निश्चित करावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.चौकशीत काम निकृष्ट असल्याचे आढळल्यास संबंधित ठेकेदार, कंत्राटदार संस्था तसेच जबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी. तसेच रस्त्याची दुरुस्ती किंवा पुनर्बांधणीचा खर्च दोषींकडून नियमानुसार वसूल करण्याची कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
सार्वजनिक निधीतून होणाऱ्या विकासकामांमध्ये गुणवत्ता, पारदर्शकता व टिकाऊपणा राखणे आवश्यक असून, या प्रकरणाकडे केवळ तक्रार म्हणून न पाहता सार्वजनिक हिताचा विषय म्हणून तातडीने कार्यवाही करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
चौकशी अहवाल, गुणवत्ता तपासणीचे निष्कर्ष व करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती ग्रामस्थांना लेखी स्वरूपात देण्यात यावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. अन्यथा उपलब्ध कायदेशीर व प्रशासकीय मार्गांचा अवलंब करून वरिष्ठ स्तरावर दाद मागण्यासोबतच लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
सदर निवेदनाच्या प्रती केंद्रीय परिवहन मंत्रालय, केंद्रीय राज्यमंत्री, जळगावचे पालकमंत्री, रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यकारी अभियंता जळगाव तसेच गटविकास अधिकारी, पंचायत समिती रावेर यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

