नशिराबादमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमे दरम्यान तणाव; अध्यक्षांवर जमावाचा रोष
पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात, मोहीम तात्पुरती स्थगित
नशिराबाद.मंडे टु मंडे न्युज. दीपक लोखंडे |||नशिराबाद नगरपरिषदेतर्फे गुरुवारी (दि. २९ ऑक्टोबर) सुरू करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. बसस्थानक परिसरातून सुरू झालेल्या या मोहिमेदरम्यान दुकानदार आणि नगरपरिषदेच्या पथकात वादावादी झाली. या गोंधळात एका दुकानदाराच्या डोक्याला दुखापत झाली, तर अतिक्रमण निर्मूलन समितीचे अध्यक्ष कीर्तीकांत चौबे यांच्याविरोधात संतप्त जमाव आक्रमक झाल्याची घटना घडली. परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी चौबे यांना सुरक्षित स्थळी हलविले. दरम्यान, नगरपरिषद प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम तात्पुरती स्थगित केली आहे.
नगरपरिषदेच्या पथकाने बसस्थानक परिसरातील अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केल्यानंतर काही दुकानदारांनी कारवाईला विरोध केला. अतिक्रमण काढण्यावरून सुरू झालेला वाद वाढत गेला. या दरम्यान एका दुकानदाराच्या डोक्याला दुखापत झाली. जखमी दुकानदाराला पुढील उपचारांसाठी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती आहे.
अध्यक्षांविरोधात जमाव आक्रमक
कारवाईदरम्यान अतिक्रमण निर्मूलन समितीचे अध्यक्ष कीर्तीकांत चौबे यांच्याविरोधात जमाव आक्रमक झाला. त्यांना शिवीगाळ करण्यात आली, तसेच नगरपरिषदेच्या अन्य कर्मचाऱ्यांनाही जमावाच्या रोषाला सामोरे जावे लागले. काही कर्मचाऱ्यांवर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. परिस्थिती अधिक बिघडू नये यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करत चौबे यांना सुरक्षित स्थळी हलविले. पोलिसांच्या प्रयत्नांमुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.
नोटिसा मिळाल्या नसल्याचा काही दुकानदारांचा दावा
अतिक्रमण हटाव कारवाईदरम्यान काही दुकानदारांनी नोटिसा बजावण्याच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतला. काही दुकानदारांना अतिक्रमण हटविण्याच्या नोटिसा मिळाल्या असल्या, तरी काहींना नोटिसा मिळालेल्या नसल्याचा दावा त्यांनी केला. दुसरीकडे, नगरपरिषद प्रशासनाने अतिक्रमणधारकांना अतिक्रमणे स्वतःहून हटविण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली होती. मात्र, या मुदतीत अतिक्रमणे हटविण्यात न आल्याने कारवाई सुरू करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
तणावामुळे मोहीम तात्पुरती स्थगित
घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त मर्यादित असतानाही पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या हस्तक्षेपामुळे पुढील अनुचित प्रकार टळल्याची माहिती आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत असून, निर्माण झालेला तणाव आणि गोंधळ लक्षात घेता नगरपरिषद प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम तात्पुरती स्थगित केली आहे.
या घटनेमुळे अतिक्रमण हटाव मोहिमेतील नोटिसा बजावण्याची प्रक्रिया, कारवाईतील पारदर्शकता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आगामी काळात नगरपरिषद प्रशासन ही मोहीम कशा पद्धतीने पुढे नेते, याकडे नशिराबादकरांचे लक्ष लागले आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

