एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवी सोहळ्याचे गिरीश महाजनांना निमंत्रण; नव्या राजकीय समीकरणांची चाहूल? ‘घरवापसी’च्या चर्चांना पुन्हा उधाण
जळगाव, मंडे टु मंडे न्यूज | महाराष्ट्राच्या, विशेषतः उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणातील कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी मानले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार एकनाथ खडसे आणि भाजपचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांच्यात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी थेट जामनेर येथे जाऊन गिरीश महाजन यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांनी आपण दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचा दावा केला होता. तसेच, अमित शाह यांनी “भाजपमध्ये या” असा आग्रह केल्याचेही त्यांनी म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर आता गिरीश महाजन यांना थेट निमंत्रण देण्यात आल्याने खडसेंच्या संभाव्य ‘घरवापसी’च्या चर्चांना पुन्हा बळ मिळाले आहे. घर वापशीची ही तयारी तर नाही ना?असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जामनेर मधील भेटीची चर्चा
खडसे यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोलते आणि सुनील नेवे यांनी जामनेर येथील मंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी जाऊन अमृत महोत्सवी सोहळ्याचे निमंत्रण दिले. त्यांनी महाजन यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे, अशी विनंतीही केली. यावेळी गिरीश महाजन मिश्कीलपणे म्हणाले, “सगळ्यांचा विषय वेगळा आणि माझा विषय वेगळा आहे.”
भेटीदरम्यान खडसेंच्या सहाय्यकांनी, “या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत. स्वागत समितीतही तुमचे नाव समाविष्ट करतो,” असे सांगितले. त्यावर महाजन यांनी, “समितीत माझं नाव नको, तुम्हाला तर सगळी पार्श्वभूमी माहितीच आहे,” असे उत्तर दिले. मात्र, त्यानंतर त्यांनी निमंत्रण पत्रिका बारकाईने पाहिली आणि हसतमुखाने प्रतिसाद दिल्याने त्यांच्या उपस्थितीबाबत उत्सुकता अधिक वाढली आहे.
राजकीय कटुता संपणार?
गेली अनेक वर्षे जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील संघर्ष चर्चेचा विषय राहिला आहे. आरोप-प्रत्यारोप, टीका आणि राजकीय संघर्षामुळे दोन्ही नेत्यांमधील दुरावा सर्वश्रुत आहे. अशा परिस्थितीत खडसे यांनी पुढाकार घेत महाजन यांना थेट निमंत्रण पाठविल्याने जिल्ह्याच्या राजकारणात नव्या घडामोडींची चर्चा सुरू झाली आहे.
आता अमृत महोत्सवी सोहळ्याला मंत्री गिरीश महाजन प्रत्यक्ष उपस्थित राहतात का आणि या भेटीतून पुढे कोणते नवे राजकीय संकेत मिळतात, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


