भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

ग्रामसभेतील दबावामुळे ग्रामपंचायत अधिकाऱ्याचा मृत्यू ; ग्रामपंचायत अधिकारी युनियनचा ग्रामसभांवर बहिष्काराचा निर्णय

जळगाव.मंडे टु मंडे न्युज |पारोळा तालुक्यातील ग्रामपंचायत शिबरे येथे कार्यरत ग्रामपंचायत अधिकारी पी. एन. पाटील यांचा ग्रामसभेदरम्यान दबाव वाढल्याने हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याचा दावा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन डी.एन.ई. १३६ यांनी केला आहे.

पारोळा तालुक्यातील शिवरे दिगर येथे ग्रामसभेदरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) पी. एन. पाटील यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला व त्यात त्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात संताप व्यक्त होत असून, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनने राज्यातील सर्व ग्रामसभांवर बहिष्काराचा मोठा निर्णय घेतला आहे.

ग्रामसभेत काही लोकांकडून विविध बेकायदेशीर वा हवे असलेले ठराव जबरदस्तीने मंजूर करून घेण्यासाठी ग्रामसेवकावर मोठा दबाव टाकला गेला. या प्रकरणी मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या संबंधित व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून कारवाई सुरू आहे. ग्रामसभा पार पाडणे म्हणजे अधिकाऱ्यांसाठी जीव धोक्यात घालण्यासारखे झाले असल्याचा आरोप युनियनने केला आहे. या संदर्भात युनियनचा बहिष्काराचा व आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला . राज्यातील सुमारे २८ हजार ग्रामपंचायतींमधील नियोजित आणि चालू ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदांना निवेदने देऊन ग्रामसेवकांना व कर्मचाऱ्यांना काम करताना सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्यात आला.

वाढत्या मानसिक तणावाचा व सुरक्षेचा मुद्दा एरणीवर आणत आंदोलनाचे स्वरूप तीव्र करण्यात आले आहे.प्रशासकीय कामकाजावर परिणामग्रामसभा बंद राहिल्यामुळे ग्रामीण भागातील विकास आराखडे रखडणार आहेत.वैयक्तिक लाभाच्या योजनांचे लाभार्थी निवडणे आणि विकास कामांचे ठराव मंजूर करणे ही कामे ठप्प झाली आहेत.

या घटनेच्या निषेधार्थ युनियनकडून मंगळवारी निवेदन देण्यात आले. तसेच, या घटनेच्या पार्श्वभूमीवर आजपासून राज्यभर ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन डी.एन.ई. १३६ यांनी घेतल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.युनियनने यापुढे कोणत्याही ग्रामसभेचे नियोजन अथवा आयोजन करू नये, अशी भूमिका घेतली आहे. तसेच सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका अध्यक्ष व सचिव, पतसंस्था पदाधिकारी आणि सन्माननीय संचालकांनी हा संदेश सर्व सभासदांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

“जिल्ह्यात आजपासून एकही ग्रामसभा झाली नाही पाहिजे,” अशी भूमिका युनियनने घेतली असून, संघटनेच्या सर्व बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे साथ असल्याचेही निवेदनातून स्पष्ट करण्यात आले आहे.दरम्यान, पी. एन. पाटील यांच्या मृत्यूच्या नेमक्या वैद्यकीय व प्रशासकीय कारणांची अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच घटनेचे पूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील ग्रामसभांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!