भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरशैक्षणिक

ऐनपूर महाविद्यालयात अभिजात मराठी भाषा दिवस उत्साहात साजरा

ऐनपूर. ता. रावेर.मंडे टु मंडे न्युज || ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात अभिजात मराठी भाषा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने होते.

अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ. अंजने यांनी अभिजात मराठी भाषेचे महत्त्व स्पष्ट केले. प्रमुख वक्ते मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. महेंद्र सोनवणे यांनी अभिजात मराठी भाषा दिनानिमित्त सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, ३ ऑक्टोबर हा दिवस महाराष्ट्र शासनाने “अभिजात मराठी भाषा दिवस” म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले असून, ३ ते ९ ऑक्टोबर हा कालावधी “अभिजात मराठी भाषा सप्ताह” म्हणून साजरा केला जातो.


३ ऑक्टोबर २०२४ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठीसह पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यास मान्यता दिली. मराठी भाषेची सुमारे २५०० वर्षांची भाषिक-साहित्यिक परंपरा, प्राचीन ग्रंथपरंपरा, विविध लिपींमधील साहित्य तसेच विविध कलाप्रकारांतील भाषावापर यांचा समृद्ध वारसा लक्षात घेऊन हा दर्जा देण्यात आला आहे.


अभिजात मराठी भाषा दिनाचे महत्त्व सांगताना त्यांनी मराठीच्या प्राचीन परंपरेची ओळख, समृद्ध साहित्यिक वारशाचे संवर्धन, प्राचीन ग्रंथ व हस्तलिखितांचा अभ्यास, संशोधनाला चालना, नवीन पिढीत मराठी भाषेविषयी जाणीव व अभिमान निर्माण करणे, बोलीभाषा, लोकसाहित्य व मौखिक परंपरांचे दस्तऐवजीकरण तसेच आधुनिक ज्ञान, शिक्षण, तंत्रज्ञान आणि संशोधनामध्ये मराठीचा वापर वाढविण्याची गरज स्पष्ट केली.
अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे व विविध संस्थांमध्ये व्याख्याने, परिसंवाद, काव्यवाचन, ग्रंथप्रदर्शने, हस्तलिखित प्रदर्शन, निबंध व वक्तृत्व स्पर्धा, वाचन उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करता येतात, अशी माहितीही त्यांनी दिली.


“३ ऑक्टोबर हा केवळ गौरवाचा दिवस नसून मराठी भाषेचा इतिहास समजून घेणे, तिचे साहित्य व लोकपरंपरा जतन करणे आणि हा समृद्ध वारसा पुढील पिढीकडे पोहोचविण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे,” असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. रामटेके यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. उमरीवाड यांनी मानले. कार्यक्रमास प्रा. भोपे, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!