ब्रेकिंग : मुक्ताईनगर येथील ‘खडसे फार्महाऊस’वर अज्ञाताकडून ड्रोनद्वारे रेकी; उच्चस्तरीय चौकशीची आ. एकनाथराव खडसेंची मागणी
मुक्ताईनगर.मंडे टु मंडे न्युज. अक्षय काठोके || मुक्ताईनगर येथील नॅशनल हायवे ६ जवळ, मलकापूर रोडवरील ‘खडसे फार्म’ या फार्महाऊसवर २८ सप्टेंबर २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीद्वारे ड्रोन उडवून रेकी व चित्रीकरण करण्यात आल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विधान परिषद सदस्य तथा माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी जळगावच्या पोलीस उपअधीक्षकांना पत्र लिहून या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची आणि संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी देखील त्यांच्या परवानगीशिवाय त्यांचा मोबाईल फोन ६२ दिवस बेकायदेशीरपणे टॅप करण्यात आला होता, ज्याबाबत मुंबईतील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून, आपल्याविरोधात मोठे षडयंत्र रचले जात असावे अशी तीव्र शंका त्यांनी व्यक्त केली आहे.
घटना घडली त्यावेळी आमदार एकनाथराव खडसे हे मुंबईत होते, मात्र त्यांच्या फार्महाऊसवर उपस्थित असलेल्या त्यांच्या वाचमनने (सुरक्षक्षकाने) संशयास्पद ड्रोन चित्रीकरण पाहत तात्काळ आपल्या मोबाईलमध्ये त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग पुरावा म्हणून तयार करून ठेवले होते. रात्रीच्या वेळी विनापरवाना अशा प्रकारे ड्रोन उडवून रेकी करणे ही सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. वारंवार घडणाऱ्या या घटना पाहता घातपाताचा किंवा मोठ्या षडयंत्राचा संशय बळावला असून, या प्रकरणी तातडीने शोध घेऊन ड्रोन उडवणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध लावावा तसेच केलेल्या कारवाईचा अहवाल आपल्याला अवगत करावा, अशी विनंती आमदार खडसे यांनी पोलीस प्रशासनाला केली आहे.


