भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमचोपडाजळगाव

तीन गावठी कट्टे, आठ जिवंत काडतुसे जप्त; तिघांना अटक,१ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

चोपडा.मंडे टु मंडे न्युज.प्रतिनिधी|| चोपडा ग्रामीण पोलिसांनी शस्त्रविरोधी कारवाई करत तीन गावठी बनावटीचे कट्टे, आठ जिवंत काडतुसे आणि मोटारसायकल असा सुमारे १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पुणे जिल्ह्यातील तिघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी लासूर गावाच्या पुढे नाटेश्वर मंदिराजवळील रस्त्यावर करण्यात आली.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, संशयितांची तपासणी केली असता त्यांच्या ताब्यात तीन लोखंडी धातूचे गावठी बनावटीचे कट्टे आढळून आले. प्रत्येक कट्ट्याची अंदाजे किंमत २५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच त्यांच्याकडून पिवळ्या धातूची आठ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून, काडतुसांच्या मागील बाजूस इंग्रजीत ‘KP 7.65’ असे नमूद असल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय संशयितांकडून हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटारसायकलही जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे १ लाख ३३ हजार रुपये आहे.

या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक शुभम ज्ञानेश्वर पाटील यांच्या फिर्यादीवरून साहील दगडू आवारे (वय १९), सौरभ संतुराम मोतीरावे (वय २३, रा. पिंपरी-चिंचवड परिसर) आणि रोहित चंद्रकांत जुजगर (वय ३०, रा. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांच्या फिर्यादीनुसार, संशयित आरोपी हे संगनमताने गावठी कट्टे व जिवंत काडतुसे विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात बाळगून मोटारसायकलवरून त्यांची चोरटी वाहतूक करीत होते, असा आरोप आहे.या प्रकरणी शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३/२५, ७/२५, भारतीय न्याय संहिता कलम ३(५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१), ३७ (३), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय जयराम सोनवणे करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!