लाचखोरीत अडकलेल्या जळगाव जिल्हा परिषदेतील दोन अभियंत्यांच्या घरझडतीत सापडली लाखोंची रोकड!
जळगाव. मंडे टु मंडे न्युज || जळगाव जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील दोन अभियंत्यांना १० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्यानंतर आता या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. उपविभागीय अधिकारी सतीश शिसोदे यांच्या आदर्शनगर येथील निवासस्थानी करण्यात आलेल्या घरझडतीत तब्बल ७ लाख ९७ हजार ९२० रुपयांची रोकड आढळून आली आहे. दरम्यान, अटकेतील सतीश शिसोदे आणि कनिष्ठ अभियंता भागवत चवरे या दोघांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कंत्राटदाराकडे मागितली होती १५ हजारांची लाच
मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम करण्यात आले होते. या कामाचे बिल मंजूर करणे तसेच मोजमाप पुस्तिका तयार करण्यासाठी कनिष्ठ अभियंता भागवत चवरे याने यापूर्वीच सब-कंत्राटदाराकडून २० हजार रुपये स्वीकारल्याची माहिती समोर आली आहे.
त्यानंतर तक्रारदार सब-कंत्राटदाराने कामासंदर्भात उपविभागीय अधिकारी सतीश शिसोदे यांची भेट घेतली असता, त्यांनी एकूण बिलाच्या दीड टक्के म्हणजेच १५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याप्रकरणी संबंधित कंत्राटदाराने २ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. यावेळी शिसोदे यांनी लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दोघांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
खिशात आणि ड्रॉवरमध्येही रोकड
कारवाईदरम्यान उपविभागीय अधिकारी सतीश शिसोदे यांच्या खिशातून १७ हजार १२० रुपये, तर कार्यालयातील टेबलच्या ड्रॉवरमधून ७४ हजार ५०० रुपये रोख रक्कम आढळली. त्यानंतर त्यांच्या आदर्शनगर येथील निवासस्थानी झडती घेण्यात आली. या झडतीत ७ लाख ९७ हजार ९२० रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली.
याशिवाय शिसोदे यांच्या पत्नीच्या नावावर बँकेत दोन लॉकर असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली आहे. या लॉकरमध्ये दागिने किंवा रोकड असण्याची शक्यता लक्षात घेता, शिसोदे यांच्या उपस्थितीत त्यांचीही झडती घेण्यात येणार आहे.
कनिष्ठ अभियंता लाच गोळा करत असल्याचा संशय!
दरम्यान, कनिष्ठ अभियंता भागवत चवरे हा उपविभागीय अधिकारी सतीश शिसोदे यांच्यासाठी कंत्राटदारांकडून लाचेची रक्कम गोळा करत असल्याची गोपनीय माहिती एसीबी पथकाला मिळाल्याचे समजते. त्यामुळे चवरे याची सखोल चौकशी केली जाणार असून, या प्रकरणात आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मंगळवारी, ३ नोव्हेंबर रोजी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. घरझडतीतील रोकड, बँकेतील लॉकर आणि कंत्राटदारांकडून कथितरीत्या गोळा करण्यात आलेल्या लाचेच्या रकमेचा तपास आता एसीबीकडून केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे आणखी कोणते धागेदोरे समोर येतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

