चिनावल येथे ५ मे रोजी महाराजस्व समाधान शिबिर अभियान
कुंभारखेडा, ता. रावेर मंडे टु मंडे न्युज. प्रा योगेश कोष्टी | महाराष्ट्र शासन आणि महसूल व वन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांच्या अंतर्गत तसेच शंभर दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत आणि जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत उद्या दिनांक ५ रोजी सकाळी १० वाजता रावेर तालुक्यातील चिनावल येथे नूतन माध्यमिक विद्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे.
सदर रावेर तालुक्यातील चिनावल येथे होणाऱ्या शिबिरात सर्व शासकीय विभाग प्रमुख उपस्थित राहणार असून सदर कार्यक्रमांमध्ये सर्व शासकीय विभाग अंतर्गत जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये लाभार्थ्यांना जातीचे दाखले, उत्पन्न दाखले ,डोमेसाईल, तसेच इतर शैक्षणिक दाखले तसेच शिधापत्रिका, संजय गांधी योजना ,पंचायत समितीच्या विविध योजना, कृषी विभागाच्या योजना, महिला व बालविकास विकासाच्या योजना, शिक्षण विभागाचे योजना, वनविभागाच्या योजना, भूमी अभिलेख विभागाच्या योजना, आरोग्य विभागाच्या योजना तसेच पशुधन विभागाच्या योजना याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. खिरोदा प्र रावेर मंडळ परिसरातील नागरिकांनी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी बहुसंख्येने कार्यक्रम स्थळी उपस्थित रहावे असे आवाहन रावेर तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, म.तहसीलदार रावेर आणि म.उपविभागीय अधिकारी फैजपुर भाग रावेर यांनी केलेले आहे.