१६० कोटींचा ‘शालार्थ आयडी’ महाघोटाळा; १२०० संशयितांच्या रॅकेटचा पर्दाफाश, जळगावच्या माजी अधिकाऱ्याला धुळ्यातून अटक, आणखी बड्या अधिकाऱ्यांवर टांगती तलवार
नाशिक, मंडे टु मंडे न्यूज : राज्यातील शिक्षण विभागाला हादरवून सोडणाऱ्या तब्बल १६० कोटी रुपयांच्या बनावट ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यात विशेष तपास पथकाने (SIT) आणखी एक मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात जळगाव जिल्हा परिषदेचे तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी शशिकांत भाऊराव हिंगोणेकर (वय ६६) यांना धुळे येथून अटक करण्यात आली असून, नाशिकरोड न्यायालयाने त्यांना २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
तपासानुसार, २०११ ते २०१५ या कालावधीत जळगाव येथे कार्यरत असताना हिंगोणेकर यांनी कार्यालयात कोणतेही प्रस्ताव प्राप्त नसतानाही २५९ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बनावट वैयक्तिक मान्यता दिल्याचे निष्पन्न झाले आहे. याच आधारावर बनावट ‘शालार्थ आयडी’ तयार करून शासनाकडून वेतन व थकबाकीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा अपहार करण्यात आल्याचा आरोप आहे.
या महाघोटाळ्यात नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांतील ८४२ शिक्षक व कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी संशयास्पद असल्याचे उघड झाले आहे. मागील तारखेचे आदेश दाखवून शासनाची १६० कोटी रुपयांहून अधिक आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा एसआयटीचा दावा आहे.या प्रकरणात आतापर्यंत सुमारे १२०० संशयितांचा सहभाग निष्पन्न झाला असून, त्यामध्ये संस्थाचालक, मुख्याध्यापक, वेतन पथकातील अधिकारी, तत्कालीन शिक्षणाधिकारी तसेच इतर संबंधितांचा समावेश आहे.
यापूर्वी या घोटाळ्यातील मध्यस्थ प्रशांत वाडीले यालाही अटक करण्यात आली होती. प्रशांत वाडीलेच्या चौकशीतील माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एसआयटीने धुळे येथे सापळा रचून हिंगोणेकर यांना ताब्यात घेतले. सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) तथा एसआयटी प्रमुख संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
या महाघोटाळ्याचा तपास वेगाने सुरू असून, येत्या काही दिवसांत आणखी बडे अधिकारी, संस्थाचालक आणि संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिक्षण क्षेत्रातील या आर्थिक गैरव्यवहारामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे.


