भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यक्राईमरावेर

रावेर शहरात अस्वच्छ पद्धतीने उघड्यावर मांसविक्री ; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

रावेर. मंडे टु मंडे न्युज | सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर रावेर शहरात पोलिसांकडून पेट्रोलिंग सुरू असताना सावदा रोडवरील एका मांस विक्रीच्या दुकानात अस्वच्छ व आरोग्यास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने मांसविक्री होत असल्याचा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला. या प्रकरणी दुकान मालकासह दोघांविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी रावेर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे, गोपनीय शाखा व गुन्हे शोध पथक शहरात पेट्रोलिंग करीत होते. यावेळी सावदा रोडवरील ‘सुपर मटन सेंटर’ येथे उघड्यावर नागरिकांना सहज दिसेल अशा पद्धतीने मांसविक्री सुरू असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.
पोलिसांनी दुकानाची तपासणी केली असता दुकानात तीन बोकडांचे मांसाचे सांगाडे लटकविलेल्या अवस्थेत आढळले. तसेच चामडे बाहेर ठेवण्यात आले होते. परिसरात कत्तलीनंतरचे रक्त साचलेले असून मांसावर मोठ्या प्रमाणात माशा बसल्याचेही आढळून आले. साचलेल्या रक्तातून दुर्गंधी येत असल्याने परिसरातील नागरिक तसेच रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या व्यक्तींच्या आरोग्यास संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

या प्रकरणी दुकान मालक शेख इरफान शेख खलील आणि शेख फिरोज शेख खलील, दोघे रा. मदीना कॉलनी, रावेर यांच्याविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपनीय शाखेचे अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल हिरालाल गुमळकर यांच्या फिर्यादीवरून गु.र.नं. ४०७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम २७१ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम १०५ व ११७ अन्वये कारवाई करण्यात आली.

मांस विक्रेत्यांना यापूर्वीही स्वच्छता व नियमांचे पालन करण्याबाबत वेळोवेळी सूचना देण्यात आल्या असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, फैजपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर तसेच रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कारवाईत गुन्हे शोध पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल समाधान ठाकूर, श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील व विशाल पाटील यांनी सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल हमीद तडवी करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!