Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राइमजळगाव

जळगावात महावितरणच्या तीन कर्मचाऱ्यांना लाचखोरीचा झटका! १५ हजारांची लाच घेताना सहाय्यक अभियंता रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात

जळगाव.मंडे टु मंडे न्युज ||  वीज चोरीचा गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीनंतर १५ हजार रुपये स्वीकारताना महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. या प्रकरणात महावितरणच्या एकूण तीन कर्मचाऱ्यांचा सहभाग समोर आला असून, जळगाव शहरातील पांडे चौक येथे शनिवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणात विशाल वसंत नेमाडे (वय ३७, सहाय्यक अभियंता, वर्ग-२), भरत कडू तायडे (वय ४५, वरिष्ठ तंत्रज्ञ, वर्ग-३) आणि रविंद्र छन्नू पाटील (वय ४१, वरिष्ठ तंत्रज्ञ, वर्ग-३) या महावितरणच्या जळगाव शहर महसूल व देयक उपविभागातील कर्मचाऱ्यांची नावे समोर आली आहेत.

नेमके प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एका रहिवाशाच्या घरी नवीन वीज मीटर बसविण्यात आले होते. दि. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे ११:१५ वाजता संबंधित तीन कर्मचाऱ्यांनी तक्रारदाराच्या घरी जाऊन नवीन मीटरची तपासणी केली. यावेळी घरातील विद्युत उपकरणांचे तसेच मीटरचे फोटो काढण्यात आले.

त्यानंतर भरत तायडे यांनी तक्रारदाराला फोन करून पांडे चौक येथे बोलावले. तेथे घरातील विद्युत उपकरणांचा लोड जास्त असल्याचे आणि सर्व्हिस वायर बायपास करून वीज चोरी होत असल्याचे सांगण्यात आले. वीज चोरीची कारवाई टाळायची असेल तर ४० हजार रुपये द्यावे लागतील, अन्यथा वीज चोरीचा गुन्हा दाखल केला जाईल, अशी कथित मागणी करण्यात आली.

४० हजारांवरून १५ हजारांची तडजोड
लाचेच्या मागणीला कंटाळून तक्रारदाराने त्याच दिवशी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या अनुषंगाने पंचांच्या उपस्थितीत लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली.

पडताळणीदरम्यान भरत तायडे आणि रविंद्र पाटील यांनी वीज चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी स्वतःसह सहाय्यक अभियंता विशाल नेमाडे यांच्यासाठी सुरुवातीला ४० हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर तडजोड होऊन १५ हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले. ही रक्कम भरत तायडे यांनी स्वतः स्वीकारण्याची तयारी दर्शविली.

पांडे चौकात एसीबीचा सापळा
शनिवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी पांडे चौक येथे पंचांसमक्ष भरत तायडे यांनी तक्रारदाराला १५ हजार रुपये विशाल नेमाडे यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहाय्यक अभियंता विशाल नेमाडे यांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ७ व १२ अन्वये
१) विशाल वसंत नेमाडे, वय ३७ वर्षे, व्यवसाय नोकरी, सहाय्यक अभियंता, महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनी मर्या. जळगाव शहर, महसुल व देयक उपविभाग, जळगाव. (वर्ग-२), रा. प्लॉट नं. ६, काशीबाई उखाजी कोल्हे विदयालयाजवळ, योगेश्वर नगर, जळगाव
२) भरत कडु तायडे, वय ४५ वर्षे, व्यवसाय नोकरी, वरिष्ठ तंत्रज्ञ, महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनी मर्या. जळगाव शहर, महसुल व देयक उपविभाग, जळगाव. (वर्ग-३), रा. प्लॉट नं. ३७, गट नं. १८५/४, न्यु लक्ष्मीनगर, सावखेडा शिवार, कोल्हे हिल्सूजवळ, जळगाव.
३) रविंद्र छन्नु पाटील, वय-४१ वर्ष, व्यवसाय नोकरी, वरिष्ठ तंत्रज्ञ, महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनी मर्या. जळगाव शहर, महसुल व देयक उपविभाग, जळगाव. (वर्ग-३), रा. हल्ली रा. फ्लॅट नं. २०४, पंडीत कॉर्नर अपार्टमेन्ट, जळगाव, मुळ रा. झरखेडा, ता.धरणगाव, जि. जळगाव. यांचेवर
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडूनच वीज चोरीच्या कारवाईचा धाक दाखवून लाचेची मागणी झाल्याच्या या प्रकारामुळे जळगाव शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पुढील तपासात आणखी कोणते तपशील समोर येतात, याकडे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!