विजेचा शॉक लागल्याने दोन तरुणांचा मृत्यू
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नाशिक (प्रतिनीधी) :- अवकाळी पावसाने पडलेला शिवजन्मोत्सव समितीचा फलक उचलून पुन्हा लावत असताना विजेचा शॉक लागल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला.
या बाबत अधिक माहिती अशी की, वडनेर रोडवरील राजवाड्याकडे जाणार्या चौकात शिवजन्मोत्सव समितीचा फलक लावलेला होता. गुरुवारी झालेला अवकाळी पाऊस आणि जोरदार वार्याने हा फलक पडला होता. (दि.19) रोजी दुपारी रस्त्याने जाणार्या या युवकांनी पडलेला फलक उचलला आणि उभा केला, त्यावेळी वरून जाणार्या वीज तारांचा फलकाला स्पर्श झाला आणि त्याचा जबर शॉक तरुणांना बसला. त्यात अक्षय किशोर जाधव (वय26)राहणार वडनेर गाव व राज मंगेश पाळदे (वय20) राहणार सौभाग्य नगर हे दोघे तरुण मृत्युमुखी पडले, तर दोन जण किरकोळ जखमी झाले.
नागरिकांनी या चौघांना बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र तोपर्यंत जाधव व पाळदे यांची प्राणज्योत मावळली होती. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. मयत राज पाळदे हा एकुलता एक मुलगा होता तर जाधव यांच्या पश्चात दोन भाऊ आहेत. जखमी राहुल पवार पाथर्डी येथे उपचार घेत आहे.


