भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, कोणत्या जिल्ह्यांना दिलायं इशारा

मुंबई, मंडे टु मंडे न्युज | राज्यात गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत पावसाने चांगली हजेरी लावली. विशेषतः कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. २४  जुलै रोजी राज्यातील ५  जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, ११ ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे घाटमाथ्यासाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे.

नाशिक शहर आणि संपूर्ण जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाच्या संततधारेमुळे गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली असून रामकुंड परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून अशातच हवामान खात्याने नाशिक जिल्ह्यासाठी पुन्हा पुढील २४ तासांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच नाशिक घाटमाथ्यावर मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोकणातील पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असून यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. इतर विभागांच्या तुलनेत मराठवाड्यात पावसाचा जोर कमी असलेला दिसून येत आहे.

पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र पुणे घाटमाथ्यावर मुसळधार ते अति मुसळधार पावसासह अतिवृष्टीची शक्यता असल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोल्हापूर घाटमाथ्यासाठी यलो अलर्ट, तर सातारा घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून तेथेही मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

तर विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाची शक्यता असून हलक्या ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत प्रामुख्याने कोरडे वातावरण राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!