बोदवडमध्ये गुंडगिरी व झुंडशाही विरोधात जनआक्रोश! बाजारपेठ बेमुदत बंद ठेवत हजारो नागरिकांचा पोलीस ठाण्यावर मूक मोर्चा
फरार आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी; तीन तासांचे ठिय्या आंदोलन
मुक्ताईनगर | मंडे टु मंडे न्यूज. अक्षय काठोके || बोदवड शहरातील वाढत्या गुंडगिरी, दादागिरी आणि झुंडशाहीच्या घटनांविरोधात रविवारी (दि. १५ नोव्हेंबर) नागरिकांचा संताप उफाळून आला. शहरातील बाजारपेठ बेमुदत बंद ठेवून हजारो गावकरी, व्यापारी, शेतकरी आणि नागरिकांनी पोलीस ठाण्यावर मूक मोर्चा काढला. शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आणत आंदोलकांनी पोलीस प्रशासनाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वतः निवेदन स्वीकारण्यासाठी यावे, अशी मागणी करत नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले.
दिवाळीच्या दिवशी तरुणांना मारहाण; आठ दिवसांनंतरही कारवाईची प्रतीक्षा
दिवाळीच्या दिवशी गांधी चौकातील अरिहंत ज्वेलर्सजवळ फटाके अंगावर फेकण्याच्या कारणावरून तीन तरुणांना दगड, विटा, पाइप आणि काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेला आठ दिवस उलटूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. याच पार्श्वभूमीवर शहरवासीयांनी एकजूट दाखवत बाजारपेठ बंद ठेवून निषेध मोर्चा काढला.
चोरी, धमक्या आणि महिलांच्या छेडछाडीच्या तक्रारींचाही मुद्दा
आंदोलकांनी दिलेल्या निवेदनात शहरातील नागरिक, व्यापारी, शेतकरी, महिला आणि शाळकरी विद्यार्थिनींना काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळक्यांकडून त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी मांडण्यात आल्या. चोरी, दादागिरी, मारहाण आणि धमकावण्याच्या घटना घडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्यानंतर तक्रारी नोंदवून घेतल्या जात नसल्याचा, तसेच तक्रारदारांची माहिती आरोपींपर्यंत पोहोचत असल्याने त्यांना धमक्यांचा सामना करावा लागत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला. त्यामुळे शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनावरील विश्वास कमी होत असल्याची भावना निवेदनातून व्यक्त करण्यात आली.
फरार आरोपींना अटक, मोकोका लावण्याची मागणी
सुमारे तीन तासांच्या ठिय्या आंदोलनानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी नखाते, विभागीय पोलीस अधिकारी बडगुजर आणि पोलीस निरीक्षक सतीश लवंगडे यांनी नागरिकांचे निवेदन स्वीकारले. मेहतर समाजाचे जिल्हाध्यक्ष मिथुन बारसे यांच्या हस्ते हे निवेदन देण्यात आले.
निवेदनात फरार आरोपींना तात्काळ अटक करावी, महिला, विद्यार्थिनी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस गस्त वाढवावी,
कुख्यात गुन्हेगारांविरोधात मोकोका कायद्यांतर्गत कारवाई करावी, तसेच शहरातील गुंडगिरी व झुंडशाहीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
या निवेदनाच्या प्रती गृह विभाग, जिल्हा पोलीस अधीक्षक, आमदार चंद्रकांत पाटील आणि तहसीलदार यांनाही माहितीस्तव पाठविण्यात आल्या आहेत.
आरोपींना अटक करण्याचे पोलीस अधिकाऱ्यांचे आश्वासन यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नखाते यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल आणि त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, मेहतर समाजाचे जिल्हाध्यक्ष मिथुन बारसे आणि उपस्थित गावकऱ्यांनी आरोपींना कठोर शासन व्हावे, शहरातील गुंडगिरी व झुंडशाहीची दहशत संपुष्टात आणावी, अन्यथा यापुढे आणखी मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा दिला.
या बेमुदत बंदमध्ये मेडिकल व्यावसायिक, डॉक्टर, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी, व्यापारी, शेतकरी आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. बोदवडमधील या जनआक्रोशानंतर आता पोलीस प्रशासनाकडून प्रत्यक्षात कोणती कारवाई केली जाते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

