राष्ट्रीय एकात्मते मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान अवर्णनीय : प्रा. डॉ. पी. आर. महाजन
ऐनपूर. ता. रावेर.मंडे टु मंडे न्युज || येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमात प्रा. डॉ. पी. आर. महाजन प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते प्रा. डॉ. पी. आर. महाजन यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मापासून ते त्यांच्या संपूर्ण जीवनप्रवासाचा आढावा घेतला. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान, नेतृत्वगुण, कणखर निर्णयक्षमता आणि देशातील संस्थानांचे विलीनीकरण करून भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी त्यांनी बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका विशद केली. राष्ट्रीय एकात्मतेच्या उभारणीत सरदार पटेल यांचे योगदान अवर्णनीय असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी संस्थानांच्या विलीनीकरणामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी बजावलेल्या ऐतिहासिक भूमिकेवर प्रकाश टाकला. देशाच्या अखंडतेसाठी त्यांनी घेतलेले कठोर निर्णय, दूरदृष्टी आणि राष्ट्रनिष्ठा आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हेमंत बाविस्कर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. संदीप साळुंखे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


