शिक्षण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात अटक, एसीबी च्या कारवाईने शिक्षण क्षेत्रात खळबळ
मुंबई,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | शिक्षण मंडळाचे वरिष्ठ अधिकाऱ्याला एसीबी पथकाडून २० हजारांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली असून या घटनेने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (वाशी) येथील विभागीय कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. वरिष्ठ अधिकारी राजेंद्र माणिक आहिरे. वय ५५ वर्ष . या अधिकाऱ्याला २० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रंगेहाथ पकडलंय.
राजेंद्र माणिक आहिरे हे विभागात उपसंचालक आणि मुंबई विभागीय मंडळाचे अध्यक्ष होते. एसीबीच्या नवी मुंबई युनिटने सुमारे दुपारी १ वाजण्याच्या सुमारास सापळा रचला. त्यानंतर त्यांना लाच घेताना अटक केली, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांनी दिली. याच प्रकरणात ५० वर्षीय जे स्टोअर्स विभागाचे प्रभारी मनोहर लक्ष्मण पवार यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
एसीबीच्या माहितीनुसार, तक्रारदार हा एक इलेक्ट्रिकल कंत्राटदार आहे. या कंत्राटदाराला वाशी सेक्टर १६ए येथील शिक्षण मंडळाच्या कार्यालयातील इलेक्ट्रिकल उपकरणांच्या देखभाल आणि दुरुस्तीचे एक वर्षाचे कंत्राट (१ सप्टेंबर २०२५ ते ३१ ऑगस्ट २०२६) मिळाले होतं. या करारानुसार, कंत्राटदाराला दरमहा जीएसटीसह ३१,१५२ रुपये देय होते.
कराराच्या नोव्हेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीतील ३,१६,८०० रुपयांची बिले मंजुरीसाठी सादर करण्यात आली होती. मात्र, कंत्राटदाराची बिले मंजूर करण्यासाठी आहिरे यांनी पवार यांच्या माध्यमातून २२,१७६ रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. लाच मागितल्यानंतर तक्रारदाराने २५ मार्च २०२६ रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली. ६ एप्रिल रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत आहिरे यांनी पवार यांच्या संगनमताने लाचेची रक्कम कमी केली. त्यानंतर २० हजार रुपये स्वीकारण्यास सहमती दर्शवली. यानंतर ७ एप्रिल रोजी एसीबीने सापळा रचला . त्यावेळी आहिरे यांना त्यांच्या कार्यालयातील केबिनमध्ये तक्रारदाराकडून २० हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पथकाकडून पुढील तपास सुरू आहे.

