भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

खळबळजनक! जळगाव तालुका हादरला ; दिवसाढवळ्या स्टेट बँकेवर सशस्त्र दरोडा ; व्यवस्थापक व कॅशियरला खुर्चीला बांधले, रोकड अन् सोने लंपास, तिघे ताब्यात

जळगाव. मंडे टु मंडे न्युज. ||जळगाव तालुक्यातील भोकर येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेवर शनिवारी (दि. ३१ ऑक्टोबर) दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. दुचाकींवरून आलेल्या अज्ञात दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश करून शस्त्रांचा धाक दाखवत कर्मचाऱ्यांना मारहाण केली. व्यवस्थापक आणि रोखपालाला खुर्चीला बांधून ठेवल्यानंतर बँकेतील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने घेऊन त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

बँकेत घुसताच शस्त्रांचा धाक; कर्मचाऱ्यांना मारहाण

शनिवारी दुपारी बँकेत ग्राहकांची वर्दळ तुलनेने कमी असल्याची संधी साधून दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश केल्याचे सांगण्यात येत आहे. सुरुवातीच्या माहितीनुसार, पाच ते सहा जण दुचाकींवरून आले होते. बँकेत शिरल्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांना शस्त्रांचा धाक दाखवून दहशत निर्माण केली.

यानंतर बँक व्यवस्थापक आणि कॅशियरला मारहाण करून खुर्चीला बांधून ठेवण्यात आले. दरोडेखोरांनी बँकेतील तिजोरीतून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने बॅगांमध्ये भरले. त्यानंतर दुचाकींवरून जळगावच्या दिशेने पळ काढला. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दरोडेखोरांनी बँक परिसरात आणि गावात चादरी विकण्याच्या बहाण्याने आधी रेकी केली असल्याचा संशय स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

डिकसाईजवळ ग्रामस्थांची सतर्कता; ग्रामस्थांचा ‘सिनेस्टाईल’ पाठलाग तिघे संशयित ताब्यात

दरोड्यानंतर पळून जाणाऱ्या संशयितांच्या हालचाली डिकसाई गावाजवळ काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्याची माहिती आहे. ग्रामस्थांनी सतर्कता दाखवत पाठलाग करत एका संशयिताला पकडले. त्यानंतर अन्य ठिकाणी आणखी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून लुटीतील रक्कम असलेल्या बॅगाही जप्त करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, जप्त केलेल्या मुद्देमालाचा नेमका तपशील अधिकृतरीत्या स्पष्ट होणे बाकी आहे.

पोलिसांची धावपळ; फरार साथीदारांचा शोध सुरू

घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ताब्यात घेतलेल्या संशयितांची चौकशी सुरू असून, फरार साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी आणि शोधमोहीम हाती घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या संशयितांपैकी एकाचा संबंध चाळीसगाव तालुक्यातील नायडोंगरी येथील असून, तो खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आल्याचे सांगितले जात आहे. अन्य एका संशयिताचा संबंध बऱ्हाणपूरशी असल्याची माहिती आहे. या तपशीलांची अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे.जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत पाटील आणि त्यांचे पथक फरार संशयिताचा शोध घेत आहेत.

लुटीचा आकडा अद्याप अस्पष्ट

या दरोड्यात नेमकी किती रोख रक्कम आणि किती किमतीचे सोन्याचे दागिने लुटण्यात आले, याचा अधिकृत आकडा अद्याप समोर आलेला नाही. बँकेतील नोंदी, सीसीटीव्ही फुटेज आणि ताब्यात घेतलेल्या संशयितांच्या चौकशीतून दरोड्याचा संपूर्ण घटनाक्रम उघड होण्याची शक्यता आहे.

भरदिवसा बँकेत घुसून सशस्त्र दरोडा टाकल्याच्या या घटनेमुळे जळगाव तालुक्यात खळबळ उडाली असून, फरार आरोपींचा शोध आणि लुटीच्या मुद्देमालाचा तपास हे पोलिसांसमोरील महत्त्वाचे आव्हान ठरले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!