धक्कादायक : नाशिकमध्ये महिन्याभरात ६४ भूकंपाचे धक्के ; तज्ज्ञांचा दावा
नाशिक. मंडे टु मंडे न्युज | नाशिक शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या महिन्याभरात नाशिक परिसरात १.६ ते ४.३ रिश्टर स्केलपर्यंतचे तब्बल ६४ भूकंपाचे धक्के नोंदवण्यात आले आहेत. शनिवारी (८ ऑगस्ट) नाशिकमध्ये ४ भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या नोंदीनुसार, शनिवारी रात्री १०.०१ वाजल्यापासून रविवारी (९ ऑगस्ट) ५.३३ वाजेपर्यंत भूकंपाचे ४ धक्के बसले. अवघ्या ७ तासांत ४ भूकंपाचे धक्के नोंदवले गेल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.
नाशिकमध्ये जाणवणाऱ्या या भूकंपाच्या मालिकेबाबत तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. सौम्य भूकंपांच्या या धक्क्यांची मालिका आणखी काही काळ सुरू राहण्याची शक्यता असून, संकट पूर्णपणे कमी होण्यासाठी आणखी महिनाभर परिस्थितीवर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
जमिनीखालील दाबामुळे सौम्य धक्के?
तज्ज्ञांच्या मते, जमिनीखाली निर्माण झालेला दाब सौम्य भूकंपाच्या धक्क्यांच्या माध्यमातून बाहेर पडत आहे. ही पृथ्वीच्या अंतर्गत हालचालींमधील नैसर्गिक प्रक्रिया असून, अशा धक्क्यांमुळे जमिनीखालील दाब काही प्रमाणात कमी होत असतो. त्यामुळे या मालिकेमुळे मोठ्या तीव्रतेचा भूकंप होण्याचा धोका आपोआपच कमी होतो, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. गेल्या जुलैपासून नाशिक परिसरात १.६ ते ४.३ रिश्टर स्केलपर्यंतचे धक्के जाणवले आहेत. त्यापैकी ४.३ रिश्टर स्केलचा धक्का तुलनेने अधिक तीव्र होता. त्यानंतर नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, पुढील महिनाभर भूकंपीय हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
३० किलोमीटरच्या फॉल्टलाइनचा दावा
नाशिक जिल्ह्याच्या आदिवासी भागात पूर्व-पश्चिम दिशेने सुमारे ३० किलोमीटर लांबीची फॉल्टलाइन असल्याचे तज्ज्ञांच्या माहितीतून समोर आले आहे. या भागातील जमिनीखालील हालचालींमुळे दाब निर्माण होत असून, तो सौम्य भूकंपाच्या रूपाने बाहेर पडत असल्याचे सांगण्यात येत आहे.
सुरगाणा, पेठ, दिंडोरी, कळवणमध्येही धक्के
नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ, दिंडोरी आणि कळवण तालुक्यांमध्ये मागील काही दिवसांत भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपांचा केंद्रबिंदू जमिनीखाली सुमारे ५ किलोमीटर खोलीवर आढळून येत असल्याचे सांगण्यात आले आहे. केंद्र उथळ असल्याने काही ठिकाणी धक्के तुलनेने अधिक तीव्रतेने जाणवत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे
भूकंपाचा धक्का पुन्हा जाणवल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तातडीने सुरक्षित आणि मोकळ्या जागेचा आधार घ्यावा. तसेच सोशल मीडियावरून पसरणाऱ्या अपूर्ण, अफवा किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये. भूकंपासंदर्भातील अधिकृत माहिती केवळ प्रशासन आणि अधिकृत यंत्रणांकडून मिळणाऱ्या माहितीनुसारच घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नाशिकमध्ये सुरू असलेल्या भूकंपीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर पुढील काही आठवडे महत्त्वाचे ठरणार असून, प्रशासन आणि तज्ज्ञांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.


