संत गजानन महाराज मंदिरात “मॉर्डन ड्रेस”ला बंदी? संस्थानचा नवा “ड्रेस कोड” चर्चेत
बुलढाणा. मंडे टु मंडे न्युज | संत गजानन महाराज मंदिराचे पावित्र्य, शिस्त आणि धार्मिक वातावरण कायम राखण्यासाठी मंदिर सेवा समितीने भाविकांच्या पेहरावाबाबत आवाहन केले आहे. अंगप्रदर्शन करणारे, अतिआधुनिक किंवा वेस्टर्न शैलीतील कपडे परिधान करून मंदिरात प्रवेश न करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी भारतीय संस्कृतीला साजेसा, सभ्य आणि पारंपरिक पेहराव करावा, असे संस्थानकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मंदिरातील आध्यात्मिक आणि धार्मिक वातावरण अबाधित राहावे तसेच भाविकांना शांत आणि शिस्तबद्ध वातावरणात दर्शन घेता यावे, हा यामागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.
महिलांसाठी कोणता पेहराव अपेक्षित?
महिला व मुलींनी साडी, सलवार-कमीज किंवा इतर भारतीय पारंपरिक व सभ्य पोशाख परिधान करून दर्शनासाठी यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुरुषांसाठीही सभ्य पेहरावाचे आवाहन
पुरुष व मुलांनी सदरा-पायजमा, शर्ट-पँट किंवा भारतीय संस्कृतीला साजेसा अन्य सभ्य पोशाख परिधान करावा, असे सांगण्यात आले आहे.
कोणते कपडे टाळावेत?
अंगप्रदर्शन करणारे तोकडे कपडे तसेच अतिआधुनिक आणि वेस्टर्न शैलीतील पेहराव टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मंदिर परिसरातील धार्मिक वातावरण आणि शिस्त कायम ठेवण्यासाठी भाविकांनी संस्थानच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
उपकेंद्रे आणि परिसरातही नियम
संत गजानन महाराज संस्थानच्या उपकेंद्रांमध्ये तसेच साजल विहार, शांतिवन आणि अमृत तीर्थ यांसारख्या परिसरांमध्येही भाविकांनी धार्मिक संस्कृतीला साजेसा आणि सभ्य पेहराव करावा, असे निर्देश देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
मंदिराचे पावित्र्य जपणे, धार्मिक वातावरण टिकवून ठेवणे आणि भाविकांना शिस्तबद्ध व शांत वातावरणात दर्शन घेता यावे, या उद्देशाने पेहरावाबाबत हे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे ‘संत गजानन महाराज मंदिरात मॉर्डन ड्रेसला बंदी?’ या मुद्द्याची सध्या भाविकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.


