भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजामनेर

किरकोळ वादातून चाकूहल्ला ; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू, जामनेर मध्ये खळबळ

जामनेर, मंडे टु मंडे न्युज | जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरातील जामनेरपुरा भागात किरकोळ वादातून झालेल्या चाकूहल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. किशोर बावस्कर असे मयत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन सख्ख्या भावांना अटक केली असून, तरुणाच्या मृत्यूनंतर आरोपींविरुद्ध खुनाच्या गुन्ह्याची वाढ करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे जामनेर शहरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जामनेरपुरा परिसरात संध्याकाळी सुमारास कन्हैय्या मित्र मंडळाचे सदस्य किशोर बावस्कर यांचा निलेश प्रभाकर नामटे आणि योगेश प्रभाकर नामटे यांच्यासोबत वाद झाला.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी दोन्ही आरोपींनी किशोर बावस्कर यांना मारहाण करून चाकूने वार केले. या हल्ल्यात किशोर गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. दुर्गादेवी मंडळाच्या पैशांच्या हिशेबावरून हा वाद झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.


आरोपींविरुद्ध खुनाच्या गुन्ह्याची वाढ
घटनेनंतर पोलिसांनी निलेश नामटे आणि योगेश नामटे या दोन्ही आरोपींना अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. हल्ल्यात वापरण्यात आलेले शस्त्रही पोलिसांनी जप्त केले आहे.

दरम्यान, किशोर बावस्कर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने दाखल गुन्ह्यात आता खुनाचे कलम वाढविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करून जास्तीत जास्त शिक्षा मिळवून देण्यासाठी तपास केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपींची घरापासून पोलीस ठाण्यापर्यंत पायी धिंड
दरम्यान, अटकेतील दोन्ही आरोपी सख्खे भाऊ असल्याचे समोर आले आहे. न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींची घरापासून जामनेर पोलीस ठाण्यापर्यंत पायी धिंड काढली.

किशोर बावस्कर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा, तसेच फाशीची शिक्षा देण्याची मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि कोणाच्याही सांगण्यावरून प्रतिक्रिया न देण्याचे आवाहन केले आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक खबरदारी घेतली जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!