भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

जळगाव जिल्ह्यात खळबळ : रावेर, यावल,चाळीसगाव,चोपडा सह. जिल्ह्यात ५८ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई, ९ कृषी केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द, तर २३ परवाने निलंबित

जळगाव, मंडे टु मंडे न्युज | जळगाव जिल्ह्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी कृषी विभागाने मोठी मोहीम राबवत नियम मोडणाऱ्या ५८ कृषी सेवा केंद्रांवर दंडात्मक कारवाई केली आहे. यातील ९ कृषी केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत, तर २३ परवाने निलंबित करून २६ दुकानदारांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. यात सर्वाधिक कारवाई  चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक २० कृषी केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे.  ई-पॉस (e-POS) मशीनमधील अनियमितता, भाव व साठा फलक अद्ययावत न ठेवणे, बिलावर स्वाक्षरी न घेणे आणि शेतकऱ्यांना देयके न देणे यांसारख्या गंभीर त्रुटी तपासणीत आढळल्या असून या सोबत जळगाव, चोपडा, यावल, रावेर आणि धरणगाव परिसरातही बोगस पीक विमा प्रकरणात अनेक कृषी केंद्रांवर गुन्हे दाखल करणे व परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार खते, बियाणे व कीटकनाशके योग्य दरात उपलब्ध व्हावीत आणि कृषी निविष्ठांच्या विक्रीत पारदर्शकता राहावी, या उद्देशाने कृषी विभागाने जिल्हाभर विशेष तपासणी मोहीम राबविली. शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने ही विशेष मोहीम तीव्र केली आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांच्या आदेशानुसार सदरची करण्यात आली. जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पद्मनाथ म्हस्के आणि जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकांनी जिल्ह्यातील खत, बियाणे व कीटकनाशक विक्रेत्यांच्या दुकानांची अचानक तपासणी केली.
तपासणी दरम्यान अनेक कृषी सेवा केंद्रांमध्ये दैनंदिन विक्री नोंदी अद्ययावत ठेवण्यात आल्या नसल्याचे आढळून आले. काही ठिकाणी खते व बियाण्यांची साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आले. तसेच शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा जादा दराने विक्री, परवान्याच्या अटी व शर्तींचे उल्लंघन, साठ्याची योग्य नोंद न ठेवणे तसेच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न करणे अशा विविध त्रुटीही तपासणीदरम्यान समोर आल्या.

विशेष म्हणजे जिल्हाभर राबविण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक तब्बल २० कृषी सेवा केंद्रांवर विविध प्रकारच्या अनियमितता आढळून आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!