शिक्षण विभागाचा अजब कारभार, मराठीला डावलून इंग्रजीला पसंती, शालेय शिक्षणाचा “पथदर्शी आराखडा” चक्क इंग्रजीत
पुणे, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्यात मराठी वरून मोठे घमासान सुरू असताना शिक्षण विभागाने राज्याच्या शालेय शिक्षणाचा ‘विकसित महाराष्ट्र २०४७’साठी चा पथदर्शी आराखडा (व्हिजन डॉक्युमेंट) मराठीत न करता चक्क इंग्रजीत तयार केला आहे.
राज्याच्या भाषा धोरणानुसार कामकाजात मराठीचा प्राधान्याने वापर करण्याचा नियम असताना शालेय शिक्षण विभागाने मराठीला डावलून चक्क इंग्रजीला पसंती दिल्याचे दिसून येत असल्याचे मोठी नाराजी पसरली आहे.
२०२५-२९, २०३०-३५, २०३६-४७ अशा तीन टप्प्यांत राज्यातील शाळांमध्ये बदल घडवण्याचे उद्दिष्ट या पथदर्शी अहवालात ठेवण्यात आले आहे. सरकारी शाळांमधील अव्यवस्था, अडचणी, खालावलेल्या शैक्षणिक कामगिरीची कबुली देत राज्याच्या शिक्षण विभागाने विकसित भारत २०४७ साठी शालेय शिक्षणाचा पथदर्शी आराखडा (व्हिजन डॉक्युमेंट) तयार केला आहे. त्यात पायाभूत सुविधा, शैक्षणिक विकास, शिक्षक, सर्वसमावेशकता, प्रशासन आणि धोरणात्मक बदल यावर भर देण्यात आला आहे. मात्र, हा अहवाल इंग्रजीत तयार करण्यात आल्याबद्दल आक्षेप नोंदवून, हा अहवाल मराठीत तयार करून जनतेसाठी खुला करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
‘शिक्षण विभाग राज्याचे ‘व्हिजन डॉक्युमेंट’ मराठीत न करता इंग्रजीत केला आहे. मराठी ही राज्याची राजभाषा असताना, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असताना शालेय शिक्षणाशी संबंधित इतका महत्त्वाचा दस्तऐवज इंग्रजीत असणे या वर मोठी टीका केली जात असून तो तत्काळ मराठीत केला जावा अशी मागणी केली जात आहे.

