देशात २०२९ पूर्वी समान नागरी कायदा ; अमित शाहांची मोठी घोषणा
मुंबई : मंडे टु मंडे न्युज | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानाची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी १३ सप्टेंबर रोजी मुंबईतील पत्रकार परिषदेत केली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या आगामी योजनांसह समान नागरी कायद्याबाबत (UCC) महत्त्वाची माहिती दिली.
अमित शाह यांनी सांगितले की, एनडीएची सत्ता असलेल्या २१ राज्यांमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याच्या दिशेने काम सुरू आहे. २०२९ सालापर्यंत याबाबत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
१२ कलमी ‘सेवा संकल्प अभियान’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात एक महिना ‘सेवा संकल्प अभियान’ राबवले जाणार आहे. या अभियानांतर्गत १२ कलमी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये रक्तदान, आभार कार्यक्रम, नमो सेवा, संगीत-नाट्यमय सादरीकरण, अंगणवाडी सेवा, सेवा ज्योती कलश यात्रा, वाडनगर ते वाराणसी यात्रा, वाराणसी ते वाडनगर यात्रा आणि ‘सेवा सेतू अभियान’ यांचा समावेश आहे.तसेच ब्लॉक आणि तालुका स्तरावर केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष अभियान राबवले जाणार आहे.
UCC लागू करण्याचा सरकारचा निर्धार
पत्रकार परिषदेत अमित शाह यांनी समान नागरी कायदा हा सरकारच्या महत्त्वाच्या अजेंड्यापैकी एक असल्याचे संकेत दिले. एनडीएशासित २१ राज्यांमध्ये UCC लागू करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू असून २०२९ पर्यंत याबाबत निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी शाह यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळातील विविध निर्णय आणि कामगिरीचाही आढावा घेतला. कलम ३७० रद्द करणे, अयोध्येतील राम मंदिराची उभारणी, चांद्रयान-३ मोहीम आणि रेल्वेचे आधुनिकीकरण यांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. देशाच्या विकासासोबतच घुसखोरीचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. देशातील प्रत्येक घुसखोराला बाहेर काढू, असा पुनरुच्चार अमित शाह यांनी यावेळी केला.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

