कायद्याचे हात लांबच! तरुणपणी एका मुलीची छेड काढली,तब्बल ४० वर्षा नंतर वयाच्या ६४ व्या वर्षी आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात
बऱ्हाणपूर : मंडे टु मंडे न्युज | न्याय मिळण्यास विलंब होऊ शकतो; मात्र कायदा गुन्हा विसरत नाही, याचा प्रत्यय मध्य प्रदेशातील खंडवा येथे आला आहे. तब्बल ४० वर्षांपूर्वी दाखल झालेल्या छेडछाडीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. १९८६ मध्ये घडलेल्या या प्रकरणातील आरोपी त्यावेळी अवघ्या २४ वर्षांचा होता. आता त्याचे वय ६४ वर्षे झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १९८६ मध्ये एका तरुणीची छेड काढल्याप्रकरणी संबंधित तरुणाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्यात अटक झाल्यानंतर त्याला जामीन मिळाला. मात्र, जामिनावर बाहेर आल्यानंतर तो न्यायालयात नियमितपणे हजर राहिला नाही आणि फरार झाला.
यानंतर तब्बल चार दशके हे प्रकरण प्रलंबित राहिले. पोलिसांनीही प्रकरणाचा पाठपुरावा सुरू ठेवत आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. अखेर दीर्घ काळानंतर पोलिसांना आरोपीचा ठावठिकाणा मिळाला आणि ६४ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली.
‘जुने काही आठवत नाही’ असा युक्तिवाद
अटकेनंतर आरोपीने वय झाल्यामुळे “मला जुने काही आठवत नाही,” असा युक्तिवाद केल्याचे सांगण्यात येते. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य न धरता आरोपीला थेट तुरुंगात पाठवले.
या कारवाईमुळे ‘देर है, लेकिन अंधेर नहीं’ या म्हणीचा प्रत्यय आला आहे. चार दशकांपूर्वीच्या गुन्ह्यातील आरोपीपर्यंत पोहोचून त्याला कायद्याच्या कक्षेत आणण्यात पोलिसांना अखेर यश आले.
कायदा गुन्हा विसरत नाही!
तब्बल ४० वर्षांनंतर झालेली ही अटक केवळ एका जुन्या प्रकरणाची कारवाई नसून, गुन्हा कितीही जुना झाला तरी कायद्याची प्रक्रिया थांबत नाही, याचा संदेश देणारी ठरली आहे. या प्रकरणातून पोलिसांची चिकाटी आणि प्रलंबित प्रकरणांचा सातत्याने पाठपुरावा करण्याचे महत्त्वही अधोरेखित झाले आहे.


