भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

न्यायालयीन कामकाजाला फटका? राज्यभरातील न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर; जळगाव जिल्हा न्यायालयासमोर धरणे आंदोलन

जळगाव.मंडे टु मंडे न्युज || सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्रातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी आज, १७ नोव्हेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपाचे पडसाद जळगाव जिल्ह्यातही उमटले असून, जिल्हा न्यायालयासमोर कर्मचाऱ्यांनी एकत्र येत धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे राज्यातील न्यायालयीन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

उच्च न्यायालयातील न्यायिक कर्मचाऱ्यांप्रमाणेच दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांनाही सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, ही आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. समान कामासाठी समान वेतन मिळावे, वेतनश्रेणीतील तफावत दूर करावी तसेच कर्मचाऱ्यांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशी मागणी कर्मचारी संघटनांकडून करण्यात येत आहे.

या बेमुदत संपात न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या चार संघटना सहभागी झाल्या आहेत. विविध मागण्यांसाठी अनेक वर्षांपासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. मात्र, वारंवार मागण्या मांडूनही शासनाकडून अपेक्षित निर्णय घेतला जात नसल्याने अखेर संपाचे हत्यार उपसावे लागल्याची भूमिका संघटनांनी मांडली आहे.

जळगाव जिल्हा न्यायालयासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनादरम्यान कर्मचाऱ्यांनी शासनाच्या धोरणाविरोधात नाराजी व्यक्त केली. उच्च न्यायालय आणि दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीतील तफावत दूर करून समान वेतनाचा न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

दरम्यान, शासनाने मागण्यांबाबत ठोस निर्णय घेऊन त्या मान्य करेपर्यंत बेमुदत संप मागे घेतला जाणार नसल्याचा इशारा न्यायालयीन कर्मचारी संघटनांनी दिला आहे. त्यामुळे राज्यातील न्यायालयीन कामकाज कितपत प्रभावित होते, प्रलंबित खटल्यांच्या सुनावण्यांवर याचा काय परिणाम होतो आणि शासन या आंदोलनाची दखल घेऊन कोणती भूमिका घेते, याकडे आता न्यायालयीन वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!