भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांना आज यलो अलर्ट; विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज

जळगाव, मंडे टु मंडे न्युज | गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या मान्सूनला पुन्हा बळ मिळण्याची शक्यता असून, राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. आज, रविवार ९ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे, विजांचा कडकडाट आणि पावसाच्या सरींची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या १० जिल्ह्यांना यलो अलर्ट
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये आज विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे.तर राज्यातील उर्वरित भागांत काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्यासह विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.

१३ ते २० ऑगस्ट दरम्यान पावसाचा जोर वाढणार?
गेल्या आठवड्यात काहीसा मंदावलेला मान्सून पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत आहेत. १३ ते २० ऑगस्टदरम्यान विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यानंतर २० ते २७ ऑगस्टदरम्यानही राज्यातील विविध भागांत पावसाची स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे.

कमी दाबाचा पट्टा सक्रिय
मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानमधील अनुपगढपासून दिल्ली, देवमाली, सिधीमार्गे पश्चिम बंगालमधील कमी दाबाच्या केंद्रापर्यंत आणि तेथून पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेला आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून सुमारे ३.१ किलोमीटर उंचीवर सक्रिय असल्याने राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, राज्यात पावसाचा जोर काही भागांत कमी-अधिक होत असला तरी आगामी काळात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर वाढू शकतो. हवामान विभागाने यलो अलर्ट दिलेल्या जिल्ह्यांतील नागरिकांनी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याच्या वेळी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!