नाशिक भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले; शहरासह विविध तालुक्यांत जाणवले हादरे, तीव्रता ४.३ रिश्टर स्केल
नाशिक . मंडे टु मंडे न्युज | नाशिक शहरासह जिल्ह्यातील विविध भागांना भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भूकंपाची तीव्रता ४.३ रिश्टर स्केल इतकी असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू नाशिक शहरापासून सुमारे ५३ किलोमीटर अंतरावर असल्याचे समोर आले आहे.
नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, दिंडोरी, पेठ, कळवण, चांदवड, देवळा यांसह विविध ग्रामीण भागात भूकंपाचे हादरे जाणवले. सप्तश्रृंगी गड परिसरातही धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय नाशिक शहरातील इंदिरानगर, मेन रोड, पंचवटी, हिरावाडी, पाथर्डी पाडा आदी परिसरातील नागरिकांनीही भूकंपाचे हादरे जाणवल्याचे सांगितले.
ग्रामीण भागातील काही ठिकाणांपासून कसारा घाट ते रामशेत किल्ला परिसरापर्यंत भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे. धक्क्यांची तीव्रता तुलनेने कमी असली तरी अचानक जाणवलेल्या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये काही काळ घबराट निर्माण झाली.
आठवडाभरापासून जाणवत आहेत धक्के
नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या आठवडाभरापासून अधूनमधून भूकंपाचे धक्के जाणवत असल्याची माहिती आहे. रविवारी जाणवलेल्या धक्क्यांमुळे नाशिक शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये पुन्हा चिंता निर्माण झाली आहे. परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
भूकंपाच्या वेळी काय काळजी घ्यावी?
भूकंपाचे धक्के जाणवत असताना नागरिकांनी घाबरून धावपळ करू नये. घरात असल्यास खिडक्या, काचा, कपाटे आणि जड वस्तूंपासून दूर राहावे. शक्य असल्यास मजबूत टेबल किंवा अन्य सुरक्षित संरचनेखाली आसरा घ्यावा. भूकंपाचे धक्के सुरू असताना लिफ्टचा वापर करू नये आणि तातडीने बाहेर पडण्यासाठी धावपळ करू नये.
धक्के थांबल्यानंतर इमारतीपासून सुरक्षित अंतरावर मोकळ्या जागेत जावे. विजेच्या तारा, झाडे आणि धोकादायक बांधकामांपासून दूर राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
तसेच नागरिकांनी अफवा किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये आणि सोशल मीडियावर ती पसरवू नये. प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे.
लहान मुले, ज्येष्ठ आणि दिव्यांग व्यक्तींची विशेष काळजी घ्या
भूकंपाच्या धक्क्यांदरम्यान लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी शांतता राखून एकमेकांना सहकार्य करावे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


