बचत गटातील महिलांचे कर्ज माफ करून होणारी पिळवणूक थांबवा– माहिती अधिकार कार्यकर्ते भिमराव कोचुरे
खिर्डी ता रावेर (प्रतिनिधी)। बचत गटातील महिलांचे कर्ज त्वरित माफ करून महिलांची होणारी पिळवणूक थांबवावी या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते भिमराव कोचुरे यांनी जिल्हाधिकारी यांना ई-मेल निवेदन पाठवले आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की,मायक्रो फायनान्स कंपन्यानी महीला बचत गटांना दिलेल्या कर्ज वसुली साठी तगादा लावत आहे.आज पर्यंत बचत गटाच्या महिलांनी कुठल्याही प्रकारची ओरड न करता नियमित वेळेवर कर्जाचे हप्ते भरलेले असून कोरोना सारख्या महामारी मुळे सर्व उद्योग व्यवसाय बंद पडल्याने कोणाच्याही हाताला काम धंदा नाही. गोर गरीबांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.अनेक लोक आर्थिक अडचणी मुळे आत्महत्या करत आहेत.तसेच राज्यातील गरीब व गरजू लाखो महिलांनी कर्ज घेतले आहे.पण अश्या वेळी व्यवसायच बंद पडल्याने व मालाचे नुकसान झाल्यामुळे ते कर्ज भरू शकत नाही.तसेच सरकार ने मोठमोठ्या उद्योगपतींना कोट्यवधी रुपयांची कर्ज माफ केली आहेत.महीला बचत गटांची तर खूपच छोटे कर्ज आहे. महीला सध्या खूप अडचणीत आहेत त्यांच्या हाताला कसलेही काम नाही तसेच घरचे पुरुष मंडळींना देखील वेळेवर काम मिळत नाही केळी कामगारांना कधी कधी चार ते पाच दिवस काम नसल्याने घरीच ताटकळत बसावे लागते प्रचंड हलाखीचे जीवन जगत आहे.आणि वरून रोजच मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या त्रासामुळे अनेक महीला निराशेचे जीवन जगत आहे.अशाच परिस्थिती मध्ये पंढरपूर येथील मनीषा निकम नामक महिलेने या कर्मचाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे.मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्जाच्या रकमेतून परस्पर विमा कपात करण्यात येते ,संकट काळात विम्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी आदेश द्यावे व महिलांची होणारी पिळवणूक थांबावावी व त्वरित संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावे.असे ई-मेल निवेदनाद्वारे मा.जिल्हाधिकारी साहेब जळगांव यांचे कडे सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते भिमराव कोचुरे यांनी मागणी केलेली आहे.

