सावकारीच्या परवान्यासाठी तीस हजारांची लाच, सहकार अधिकाऱ्यांसह दोन प्रमाणित लेखापरीक्षक एसीबी च्या जाळ्यात
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज | सावकारीचा परवाना काढून देण्यासाठी तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहकार अधिकाऱ्यांसह दोन प्रमाणित लेखापरीक्षक याना जळगाव लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात अटक केली.या घटनेने सहकार विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
यातील तक्रारदार हे भुसावळ येथील रहिवासी असून त्यांना सावकारी व्यवसायासाठी सावकारी परवाना काढावयाचा होता. त्याकरिता दिनांक ३०/०३ /२०२६ रोजी तक्रारदार यांनी भुसावळ येथील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालय, भुसावळ येथे जावुन लेखी अर्ज दिला होता. तक्रारदार यांना सदर कार्यालयातील श्री. गरुड, सहकार अधिकारी यांनी सावकारी परवाना काढुन देण्याच्या मोबदल्यात २०,०००/- रुपयांची लाचेची मागणी करून, ऑडिटर विसपुते यांना भेटण्यास सांगितले. त्याबाबत तक्रारदार यांनी आरोपी विजय विनायकराव गरुड व सुरेश जनार्दन विसपुते, प्रमाणित लेखापरीक्षक (खाजगी इसम ) यांचेविरुद्ध दि. २३.०४.२०२६ रोजी ला.प्र.वि., जळगाव यांच्याकडे तक्रार दिली होती.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचमागणी पडताळणी कारवाई करण्यात आली त्या दरम्यान आरोपी सुरेश विसपुते यांनी तक्रारदार यांना सावकारीचा परवाना काढून देण्याच्या मोबदल्यात गरुड यांच्यासाठी, स्वतःसाठी तसेच हेमंत काळे, प्रमाणित लेखापरीक्षक ( खाजगी इसम ) यांचेसाठी एकूण ३०,०००/- रुपये लाचेची मागणी केली. त्याप्रमाणे दि. १५.०६.२०२६ रोजी यशस्वी सापळा कारवाई दरम्यान भुसावळ शहरातील नाहाटा चौफुली परिसरात आरोपी सुरेश विसपुते यांनी आरोपी हेमंत काळे यांच्याशी फोनवरून बोलणे करून दिल्यावर हेमंत काळे यांनी लाचेची रक्कम स्विकारण्यास प्रोत्साहन दिले.
त्यानंतर आरोपी सुरेश विसपुते यांनी ३०,००० /- रु.लाचेची रक्कम तक्रारदार यांचेकडून पंचांसमक्ष स्वतः स्वीकारली व लाच रक्कमेतील ५,०००/-रू आरोपी गरूड, सहकार अधिकारी यांच्या मागणीप्रमाणे त्यांना फोन पे द्वारे पाठविली म्हणुन सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालय, भुसावळ येथील
१)विजय विनाकराव गरूड, सहकार अधिकारी रा.धुळे (वर्ग-३)
२) सुरेश जनार्दन विसपुते वय ६२ वर्षे धंदा व्यवसाय, प्रमाणित लेखापरिक्षक, रा. माऊलीन्गर, रेफुका माता मंदिराजवळ, राजस्थान मार्बलच्या मागे, भुसावळ नि. जळगांव
३) हेमंत प्रकाश काळे, वय ४० वर्षे धंदा व्यवसाय प्रमाणित लेखापरिक्षक रा ६१, विवेकानंद नगर,जिल्हापेठ, जळगांव. यांच्या विरूध्द भुसावळ येथील बाजारपेठ पोलिस स्टेशनला भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ चे कलम ७, ७ अ व १२ प्रमाणे. रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई पर्यवेक्षण व सापळा अधिकारी श्री. हेमंत नागरे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि., जलगांव,सापळा कारवाई, सापळा पथक श्रीमती रेश्मा अवतारे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि., नंदुबार कॅम्प, जळगांव, श्रेणी पोउनि/दिनेशसिंग पाटील, श्रेणी पोउनि /सुरेश पाटील, पोहेकों किशोर महाजन, यांनी यशस्वी केली.

