डोक्यावर दगडाने वार करून ५५ वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या ; जळगाव तालुका हादरला !
जळगाव.मंडे टु मंडे न्युज ||दिवाळीचा उत्साह सुरू असतानाच जळगाव तालुक्यातील जळके शिवारात एका ५५ वर्षीय व्यक्तीचा डोक्यावर दगडाने किंवा धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज सोमवार दि. ९ नोव्हेंबर रोजी दुपारी उघडकीस आली. गोरख विठ्ठल ठाकूर (वय ५५, रा. अंतुर्ली, हल्ली मुक्काम पुणे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे जळगाव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

नातेवाईकाच्या शेतात गेले अन् घडली घटना
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गोरख ठाकूर हे पुणे येथे वास्तव्यास होते. गेल्या आठ दिवसांपासून ते शिरसोली येथील नातेवाईक ज्ञानेश्वर राजाराम ठाकूर यांच्याकडे आले होते. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ते ज्ञानेश्वर ठाकूर यांच्या जळगाव तालुक्यातील जळके शिवारातील शेतात गेले होते.

याचदरम्यान अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यावर दगडाने किंवा धारदार हत्याराने जोरदार वार केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, शेतात काहीतरी वाद सुरू असल्याची माहिती संशयिताच्या नातेवाईकाकडून घरी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर या घटनेची माहिती समोर आली.

मुकुंदा पाटील याच्यावर संशय; खुनामागील कारण अस्पष्ट
प्राथमिक माहितीनुसार, मुकुंदा पाटील याच्यावर खुनाचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, मृत व्यक्ती आणि संशयितामध्ये नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला होता, तसेच या हत्येमागील नेमके कारण काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या दिशेने तपास सुरू आहे.


वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातही पोलिसांनी भेट दिली.
संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत असून, वृत्त लिहिपर्यंत या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता. पोलिसांच्या तपासानंतर खुनाचे नेमके कारण आणि घटनेचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

