भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यक्राइमजळगाव

ऐन दिवाळीत जळगाव जिल्ह्यात एफ डी ए ची धडक! जिल्हाभरात ठिकठिकाणी लाखोंचे तेल जप्त

जळगाव | मंडे टु मंडे न्यूज || दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खाद्यपदार्थांची मागणी वाढत असताना अन्न व औषध प्रशासनाने भेसळ तसेच अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील सात तेल उत्पादक कंपन्यांची अचानक तपासणी करण्यात आली. या तपासणीत एका कंपनीत नियमांचे उल्लंघन आढळल्याने तब्बल ७ लाख ६५ हजार रुपये किमतीचा ४ हजार ४२५ किलो खाद्यतेलाचा साठा जप्त करून सील करण्यात आला. या कारवाईने तेल उत्पादक व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

दिवाळीच्या काळात खाद्यतेल, मिठाई, खवा यांसह विविध खाद्यपदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढते. या पार्श्वभूमीवर ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. याच मोहिमेंतर्गत जळगाव एमआयडीसीतील सात प्रमुख तेल उत्पादक कंपन्यांची तपासणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान एका कंपनीत अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पथकाने तातडीने कारवाई करीत ४ हजार ४२५ किलो खाद्यतेलाचा साठा जप्त केला. या साठ्याची बाजारभावानुसार किंमत ७ लाख ६५ हजार रुपये असल्याची माहिती आहे. जप्त तेलाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, अहवाल प्राप्त होईपर्यंत संबंधित साठ्याचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.

ही कारवाई सहायक आयुक्त दीनानाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार, किशोर साळुंखे आणि आकाश बोराडे यांच्या पथकाने केली.

जिल्ह्यातील इतर ठिकाणीही कारवाई

जळगाव शहरापुरती ही मोहीम मर्यादित न राहता जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्येही तपासणी आणि कारवाई करण्यात आली.

  • पारोळा : एका केटरर्सचा परवाना रद्द करण्यात आला.
  • चाळीसगाव : ९ हजार १०० रुपये किमतीचा २४ किलो खवा जप्त.
  • धरणगाव : १७ लाख २३ हजार रुपये किमतीचे ४ हजार ५०० किलो तेल जप्त.
  • चोपडा : अस्वच्छ वातावरणात तयार केले जात असल्याचे आढळलेल्या १६ हजार रुपये किमतीच्या पेढ्यांचा साठा जप्त.

ग्राहकांनी खरेदी करताना दक्षता घ्यावी

सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांची खरेदी करताना नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तेल, खवा, मिठाई तसेच इतर खाद्यपदार्थ खरेदी करताना उत्पादनाची गुणवत्ता, पॅकिंग, मुदत आणि परवाना यांची खात्री करावी. भेसळ किंवा अस्वच्छतेचा संशय आल्यास संबंधित विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

दिवाळीपूर्वी सुरू झालेल्या या धडक मोहिमेमुळे जिल्ह्यातील खाद्यपदार्थ उत्पादक आणि विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून, आगामी काळात तपासणी मोहीम आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.क

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!