७३ वर्षीय आजीबाईंना “लिव्ह-इन” रिलेशनशिप ची हौस, आणि ५७ लाखांचा गंडा
डोंबिवली,मंडे टु मंडे न्युज | डोंबिवलीतील ७३ वर्षीय आजीबाईंची मॅट्रिमोनिअल साईटद्वारे मैत्री करून लिव्ह-इन रिलेशनशिपचे आमिष दाखवून ५७ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय भामट्याला डोंबिवली च्या विष्णूनगर पोलिसांनी दिल्लीतून जेरबंद केले आहे. आरोपी अनुज संतोष तिवारी याने देशभरातील अनेक महिलांना अशाच प्रकारे गंडा घातल्याचे तपासात समोर आले आहे. अनुज संतोष तिवारी उर्फ अनुजकुमार चंद्रप्रकाश त्रिवेदी या आरोपीने मॅट्रिमोनिअल संकेतस्थळावरून (Matrimonial Site) वृद्ध महिलेशी ओळख वाढवून विश्वास संपादन केला. त्यानंतर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचे आमिष दाखवून वैद्यकीय व कौटुंबिक कारणांसाठी टप्प्याटप्प्याने तब्बल ५७ लाख रुपये उकळले. विष्णूनगर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आंतरराज्यीय गुन्हेगार अनुज तिवारीला दिल्लीतून अटक केली.त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे
डोंबिवलीमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचे प्रलोभन दाखवून एका ७३ वर्षीय ज्येष्ठ महिलेची तब्बल ५७ लाख रूपयांची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मॅट्रिमोनियल संकेतस्थळावर ओळख करून विश्वास संपादन करणाऱ्या एका आंतरराज्यीय भामट्याच्या विष्णूनगर पोलिसांनी दिल्लीतून मोठ्या महत्प्रयासाने मुसक्या आवळल्या आहेत. भामट्याने केलेल्या फसवणुकीमुळे पिडीत आजीवर थेट वृद्धाश्रमात जाण्याची वेळ आली असून या आजी प्रमाणे भामट्याने देशभरातील अनेक महिलांना अशाच प्रकारे गंडा घातल्याचे उघड झाले आहे. अनुज संतोष तिवारी उर्फ अनुजकुमार चंद्रप्रकाश त्रिवेदी उर्फ अनुजसिंग संतोष सिंग अग्रवाल असे वेगवेगळी नावे धारण करून अडल्या/नडल्या महिलांची फसवणूक करणाऱ्या ४८ वर्षीय बदमाशाचे नाव आहे.
नेमकं काय आहे हे प्रकरण ?
डोंबिवलीत राहणाऱ्या ७३ वर्षीय वृद्ध महिलेने आयुष्याच्या उत्तरार्धात सोबती मिळावा यासाठी एका मॅट्रिमोनियल संकेतस्थळावर नाव नोंदविले होते. तिथे तिची ओळख अनुज संतोष तिवारी उर्फ अनुज सिंग उर्फ अनुज त्रिवेदी याच्याशी झाली. आजींशी गोड बोलून जवळीक साधली आणि एकत्र राहण्याचे अमिष दाखविले. त्यानंतर विविध घरगुती आणि वैद्यकीय कारणे सांगून त्याने महिलेचा विश्वास संपादन केला आणि तिच्याकडून टप्प्याटप्प्याने तब्बल ५७ लाख रुपये उकळले. पैसे हाती लागताच त्याने आजींशी संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर आजींनी कपाळावर हात मारला.
आजीला वृद्धाश्रमात राहण्याची पाळी
मोठ्या आर्थिक फसवणुकीमुळे पिडीत आजीची आयुष्यभराची जमापुंजी संपुष्टात आली आहे. अचानक झालेल्या आर्थिक आघातामुळे आणि उत्पन्नाचे कोणतेही साधन न उरल्याने आजींवर आता थेट वृद्धाश्रमात जाऊन राहण्याची अत्यंत दुर्दैवी वेळ आली आहे. या प्रकारामुळे आजी राहत असलेल्या परिसरातील रहिवाशांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.
या संदर्भात आजींनी दिलेल्या तक्रारीवरून विष्णूनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६ (२), ३१८ (२), ३३६ (२), ३३६ (३), ३३८, ३४० (२) अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचे लोकेशन दिल्लीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांच्या एका पथकाने दिल्लीत जाऊन आरोपी अनुज तिवारी याला बेड्या ठोकल्या. मूळचा उत्तर प्रदेशातील लखनऊचा राहणारा असलेला हा बदमाश प्रत्येक वेळी वेगवेगळी नावे सांगून महिलांना जाळ्यात ओढत असे.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत या भामट्याने केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये अशा प्रकारे अनेक महिलांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. मॅट्रिमोनियल साईट्सवर एकट्या राहणाऱ्या किंवा सोबतीच्या शोधात असलेल्या महिलांना लक्ष्य करणे हा त्याचा गोरख धंदा आहे. त्याने आतापर्यंत किती महिलांना किती रूपयांचा गंडा घातला आहे, याचा अचूक आकडा शोधण्याचे काम पोलिस करत आहेत.हा बदमाश सद्या आरोपी न्यायालयीन कोठडीत असून विष्णूनगर पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या आरोपीने किंवा अशा प्रकारे इतर कोणत्याही व्यक्तीने मॅट्रिमोनियल साईटच्या माध्यमातून कोणाची फसवणूक केली असेल, तर पिडीत महिलांनी न घाबरता पुढे येऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन विष्णूनगर पोलिसांनी केले आहे.
बदमाशाची भन्नाट कार्यपद्धती
आरोपी मेट्रोमोनियल डॉट कॉम, शादी डॉट कॉम आणि साथी ॲप सारख्या संकेतस्थळांवर जाहिराती द्यायचा. विधवा, निराधार किंवा ज्यांची मुले परदेशात नोकरीला आहेत अशा एकट्या राहणाऱ्या श्रीमंत महिलांना लक्ष्य करायचा. संपर्कासाठी दुसऱ्याच्या नावाने घेतले सिम कार्ड वापरायचा आणि वेगवेगळी नावे सांगून खरी ओळख लपवायचा. महिलांशी मैत्री करून विश्वास संपादन करायचा आणि त्यांच्या घरात ये-जा सुरू करायचा. विश्वासाच्या नावाखाली सोने-दागिने चोरणे, घर विकण्यास लावून पैसे लुबाडणे आणि कर्जाच्या नावाखाली मालमत्ता हडपणे असे प्रकार करायचा.


