भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

१७ वर्षीय तरुणाचा सुकी नदीच्या डोहात बुडून मृत्यू, यावल मध्ये शोककळा

यावल, मंडे टु मंडे न्युज | यावल तालुक्यात रविवार रोजी एक दुर्दैवी घटना घडली. यावल तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांतील हरिपूरा धरणाच्या वरील बाजूस असलेल्या सुकी नदीच्या डोहात रविवारी दि. १९ जुलै रोजी दुपारी यावल शहरातील १७ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला .जयेश संजय फेगडे (रा. महाजन गल्ली, यावल) असे मृत तरुणाचे नाव असून तो कुंटुंबातील एकुलता एक मुलगा होता. या घटनेमुळे यावल शहरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जयेश संजय फेगडे हा रविवारी सुट्टी असल्याने आपल्या चुलत भाऊ व वहिनीसोबत हरिपूरा धरण परिसरात फिरण्यासाठी गेला होता. पावसामुळे नटलेल्या निसर्गाचा आनंद घेत असताना तो धरणाच्या वरील बाजुस असलेल्या सुकी नदीच्या डोहातील पाण्यात पोहण्याकरीता गेला. त्यात पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. सोबत असलेल्या नातेवाईकांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र तो निष्फळ ठरला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. या घटनेनंतर रुग्णालयात नातेवाइकांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जयेश हा यावल येथील होमगार्ड संजय सिताराम फेगडे यांचा मुलगा होता. कुटुंबातील एकुलत्या एक मुलाच्या आकस्मिक निधनाने फेगडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण यावल परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनिल पाटील करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!